पानं

Tuesday, December 21, 2021

माई सुरेखा पिंगळे वाढदिवस

 बोलते मी , 

बोलणेच सुख मला.. 

बोलघेवडी मी  , 

"बोल ' चिकटले मला ! 


मीच भोळी बोलते , 

न मनात काही ठेवते , 

विशुद्ध या मनास 

कुणी "अबोली ' हि चिडवते ! 


सून तेव्हा नवनवीन ,

बोलणेच विसरले  .. 

गडबड ,धडपड, बडबड 

सर्व काही थांबले ! 


मितभाषी साथ मिळता ,

बोलणेच टाळले ,

माहेराचे वागणे अन ..

सासरास जपणे. 


दोन तऱ्हा ,  रित भात

मी स्वतःस जिरवले !

आई , सखी ,सून , वहिनी 

भूमिकांच जगले ! 



सांभाळणे अन निभावणे

जगणे हेच मानले 

अन जगायचेच राहिले ... 

प्रसन्न स्वागतास सज्ज सदा .. 

मी स्वतःस हरवले ...

मी मलाच हरवले ..

मी मात्र हरवले !



अनवरत बोलघेवडी माई लग्न झाल्यावर एकदम शांत शांत अस्मादिकांनी अनुभवलेली, रेल्वे क्वार्टर अमरावतीला !!

आज शुभेच्छा वाढदिवसाच्या देतांना , संजयरावांच्या अबोली अक्कडसासुला पुण्यनगरीतून  प्रणाम !

मायटा तुला दीर्घ  आयुष्य , तू पूर्वाश्रमीची शास्त्री असल्यामुळे  नशिबात लिहिलेलं .. ते निरामय लाहो हिच सद्गुरू  नारायणगुरूचरणी प्रार्थना 


अगस्ती 

सौ मीनल 




   

Tuesday, December 14, 2021

ती बेटी होती म्हणुनी

 ती चे लाघव आज परमोच्च होते ..

ती चे डोळे सतत भिरभिरत होते ..... 

ती एकाला शोधत होती ...

ती अस्वस्थ होती 

ती ला आज नवीन आवडती सोबत मिळणार होती तरीही  ! 

ती आतापर्यंत ज्या डोळ्यांच्या धाकात वाढली 

ती आज त्याच डोळ्यांना शोधत होती ... 

ती ची आज त्याच्या डोळ्यांकडे बघण्याची हिम्मत नव्हती ..

तरीही ती त्याच डोळ्यांकडे भिरभिरत होती पाणावलेल्या डोळ्यांनी ...

ती सांगती झाली   "बाबा जेवले नाही काका  '  

ती चे लक्ष सगळ्या गदारोळात बाबाकडेच होते ... जरी 

ती आज वधूच्या भूमिकेत होती..

ती मुलगी होती म्हणून ... 


अन तो ही आज दूर दूर राहण्याच्या प्रयत्नात होता 

तिचं कौतुक सोहळा चाललेला मात्र 

आजपर्यंत धाकात वाढवलेल्या लेकीची नजरानजर तो चुकवण्याच्या प्रयत्नात होता !

आता त्याची पित्याच्या भूमिकेत वेगळेपणा आलेला !

त्याच्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा अतोनात प्रयत्न तो आज करत होता . ... 

लहाण्या लेकराचं परिवर्तन आज नवी जबाबदारी खांद्यावर घेणार लेकरू असं होणार होतं ! 

अन तो बाप या दिवशी अनावश्यक गप्पा इतरांशी मारत वेळ निभावत होता ...

एकदा लेकराला वाटे लावू मग अश्रूंना वाट लावून देऊ अन मोकळे होऊ याचीच तो वाट पाहत होता !

अन लेकरू बस कडे निघाली ... एव्हाना दाटून ठेवलेले , दडपून दाटलेले ओकसाबोक्शी बाहेर पडले !

आज तो वधुपिता होता ..

तो बाप होता म्हणून ...



मुलगी ही बापाचीच असते हे मात्र खरे ! कष्ट तिच्या मायनं कितीही उपसू देत ... मुली बापावरच प्रेम करतात , लावतात हा माझा अनुभव आहे.... 



मी नशीबवान मला बेटी आहे ... अन तापट मित्र विकासही !!!



मित्र विकासाच्या मुलीचे चि डॉ श्यामली च्या विवाहात अनुभवलेलं !

13 dec 2021

Tuesday, December 7, 2021

छोटी सुप्पर वायझर

 " खडकाळ प्रांत तो

    ही जेथून निघाली
पथ शोधीत आली
     रानातून अकेली ...   '
काल छोटीच अभिनंदन करतांना कुसुमाग्रजांचे शब्द आठवले ! नाना निघतांना म्हणाले "सगळे भाऊ तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नको ' .. अन मी नेहमी छोटीला सांगतो "तुझे तुलाच निपटायचे आहे , डोळ्यात पाणी काढत बसू नको ...' असे उपचार !!
   काल छोटीला प्रमोशन मिळाले ती मोठ्ठी झाली अतिशय आनंद झाला .नानांचा फोन गदगदलेल्या स्वरात सांगत होता छोटी सुपरवायजर  झाली ... अन सर्व आठव डोळ्यासमोर नानांनी उभे केले ! नानांनी केलेली मेहनत ती .कामात आली . .. त्यांच्या मेहनतीला छोटीनी न्याय दिला पदोन्नती मिळवून  ! संस्थाचालकांनी तिला निवडले दोघींमधून ... संस्था चालक हे उद्योगपती आहेत संपूर्णतः प्रोफेशनल ! उगाच भावनेत ते निर्णय नक्कीच घेणारे नाहीत .

   तिची दोन/अडीच हजार रुपयांच्या पगारावर काही वर्षे केलेल्या नोकरी पासुनचा मी साक्षीदार आहे ! स्वाभिमानी छोटी कुणापुढे हात पसरवणारी ... अशक्य ! तेवढ्याच रकमेत नानांच्या साथीने तिनं घर हाकललं u. नानांच्या जिल्हा परिषदेच्या चकरा ... ते सीटर रिक्षांन फिरणं ती नानांची पायपीट औरंगाबादेत , अन तिकडे छोटीनी शाळेत अपार मेहनत घेत , अंगावर स्वतःहून अन्यन्य जबाबदाऱ्या घेत , शाळेचा अविभाज्य घटक स्वतःला बनवत ... दिलेलं काम कुणीही करतच मात्र दोन तीन हजारात काम करणाऱ्या छोटीचं शाळेतील योगदान संस्थाचालकांसाठी अनिवार्य अन महत्वाचं  झाले होते ! त्यांनीही साथ दिली , नानांचे प्रयत्न कामाला आले अन आता त्याची फलश्रुती मिळाली .
     आणि हे सगळं तिनी एकटीनं केले हे मी म्हणतोय , मग नानांची साथ ? ... मग मी म्हणतो ज्याचे त्यालाच निपटायचे असते . बाकीचे सगळे केमिस्ट्रीतल्या कॅटॅलिस्टच्या भूमिकेत असतात अगदी नानांची भूमिकाg🗺️
सुद्धा ! 
       एकटीन रस्ता शोधायचा असतो ! पूर्वी खूप चिडचिड करायची , आता हसत खेळत ,डोळ्यात पाणी न काढता ...  खंबीर छोटी ! वास्तविक छोटी अन पल्ली मुत्र्या डोळ्याच्या म्हणून फेमस होत्या . दोघींनी स्वतःला सबळ केले .  स्वबळावर उभं राहून सक्षम केलं त्यांनी स्वतः ला . ..
" भाऊ तुझ्या पाठीशी ...' सांगताना नानांना इतकेच सांगतो तुम्ही लेकींना अस घडवलंय का त्याच भावांच्या पाठी उभ्या असतात . जशी गुडडी माझ्या पाठीशी !!
          छोटी नी आज आनंद दिला .शाळेत  सौ विदुला पदे मॅडम "सुप्पर ' वाईज नक्कीच करतील यात शंका नाही.  तिच्या नव्या जबाबदारीला शुभेच्छा मनःपूर्वक .

अगस्ती
सौ मिनल

=
^

बाबासाहेब आम्ही क्षमा केली तुम्हाला

     असा पायजामा काढला,  तो तसाच ठेवला ...  बाहेरून आल्यावर दोन पाय घातले दोन भोकात ....वर ओढला की झालं !! दादामामा जागच्या जागी कपडे कसे असावे हे एक्सप्लेन करत होता ... गम्मत चाललेली ! 

        बाबासाहेबांची टॉप टीप , आवरा आवर हा चर्चेचा विषय .. त्यांना अस्ताव्यस्त काही आवडत नाही अन पाला पडला खोलापूरकरांशी !!  

        पण तक्रार न करता त्यांचे आवरणे आजतागायत सुरू आहे .आपण बाहेरचे कपडे काढा त्यांना आपल्या न कळत त्यांची जागा मिळालेली असेल ... 

       समर्थांनी दासबोधात उत्तम गुण लक्षणं लिहिलीत ..त्यांची जणू  कृतीतून पारायणं करण्याचा विडा बाबासाहेबानी उचलला ... 


*आळसे सुख मानू नये । चहाडी मनास आणू नये । शोधील्यावीण करू नये । कार्य काही ।*


एक अत्यंत पापभिरू जीवनप्रणाली आचारलेले बाबासाहेब , 

कुठेतरी लहानपणी भोगलेली गरिबी जन्मभर सांभाळणारे बाबासाहेब , 

शिस्तबद्ध जीवन ते काय याचा आदर्श घालून देणारे बाबासाहेब ! 


परवा सकाळी नंदया कडे उठलो आम्हाला नागपूर साठी तयार व्हायचे होते ... बाबासाहेबांना विचारलं तुम्ही इतके तयार होऊन कुठे निघालात ...अरे थोडासा वॉक घेऊन येतो म्हणाले ! सकाळच्या वॉक साठी इतके टकाटक , शर्ट इन बीन करून ...  

    बरं यांना खरंच आपल्या सासुरवाडीचा  संताप येत असेल का ? त्यांनी गिळला असावा ! 

       लहानपणीच्या वास्तवतेला जन्म भर सोबत राखणारे दोघे ... एक भाऊ दुसरे बाबासाहेब . संकोच , गरिबांबद्दलची कणव दोघांनी जन्मभर सोबत ठेवलेली .  . . 

      दोघांनी सासर माहेर छान जपलेलं ! बाबीताई च्या बडनेऱ्याच्या घरापासून ते पिंपळे सौदागरच्या फ्लॅट पर्यंत प्रोत्साहन देण्यापासून आर्थिक मदती पर्यंत आपला भार त्यांनी उचललेला ! 

       आर्थिक शिस्त त्यांच्या कडून शिकावी . "अंथरुण पाहून पाय पसरव रे बाबा ' सांगायला ते कधी चुकणार नाहीत . तसेच कुणाचे उपकार नको रे बाबा ... हे ओझं घेऊन त्यांनी जीवन क्रमण केले नाही !

        ते समर्थ जगले ...

*कोणाचा उपकार घेऊ नये । घेतला तरी राखो नये ।परपीडा करो नये। विश्वासघात ।*

         मुलांवर सुद्धा त्यांचेच संस्कार ! सगळे शिस्तीत , टापटीप अन स्वच्छ ! वैभव तर लहानपणी शर्ट इन करूनच झोपायचा म्हणे .... 


     आईला अन शिलामावशीला  सांभाळणे म्हणजे कसरतच . दोघांनी पेलली बघा भाऊ अन बाबासाहेब . अण्णा आजोबांचा तापट पणा या दोघींच ऐश्वर्य ! 

         किरीकर कुरकुरत का होईना भाऊंनी अन बाबासाहेबानी निभावलं ! आई तर आता नाही मला झोडयाला ,  मावशी मागे लागेल हाती झाडू घेऊन ... 


तर तिर्थस्वरूप बाबासाहेब काका ( खरे तर आम्ही काका कधी म्हटलं नाही त्यांना ) यांना उदार अंतःकरणाने आम्ही क्षमा करत आहोत .... 


आम्हाला शिस्त शिकवल्या बद्दल ...

आम्ही अस्ताव्यस्त फेकलेल्या कपड्याना जागच्या जागी ठेवल्या बद्दल ...

सकाळी मनाप्रमाणे लोळू दिल्याबद्दल ...

आमच्या साठी आठवणींनी इंदोरी फरसाण आणून जिभेचे चोचले पुरवले अन  वाढवल्याबद्दल .... 

आम्हाला मंदिरात माथा टेकवायला लावल्याबद्दल ..

झोपतांना चादरी वरच्या वळ्यासुद्धा ..... 

आमच्या चुकांवर पांघरून घातल्याबद्दल... 

स्वच्छतेला पुजायला लावल्याबद्दल ... 

आणि हो प्रेम ते काय कसे करावे हे शिकवल्याबद्दलही ...


आणि हो मिनल हि तुमचीच देण ... त्याबद्दलही तुम्हाला क्षमा !!!! 


दीर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हा लाहो । 

विघ्न विनाशक गणेश तुम्हा वर देवो सुखदम ।

जिवेत शरद: शतं 

जिवेत शरद: शतं 


अगस्ती 

सौ मीनल 



      

Wednesday, October 27, 2021

बहिणाई वाढदिवस शुभकामना

 मी भनकलो

म्हटलं
"देवा तुझ्या अस्तित्वाची
खूण सांग ?'
म्हणाला
"भाऊ आई मध्ये पहा'
म्हटले
"अरे निष्ठूरा त्यांना तर तू
सोबत नेले ,अन लवकर  ...'
उत्तरला "अरे मूर्खा
"ताई ' त आई सोडली ना ! '
मी शोधली
बाबी ताईत
' आई '....
मला मिळाली !!

उदंड आयुष्याच्या शुभकामना बहिणाई !
अगस्ती 

बहिणाई ...

 


Saturday, August 14, 2021

गुडडी

 ती  दिवटी आहे ..

पण खंबीर आहे 

म्हणून प्रत्येकाच्या पाठी आहे !

आम्हा लोकांचा विश्वास आहे . 


ती कष्टीक आहे .. 

म्हणून सर्वांच्या मनात आहे 

ती हवीहवीशी आहे कारण..

तिच्या जवळ प्रश्नांची उत्तरं आहेत ! 


ती अनेकांचे अश्रू पुसते ...

ती क्रित्येकांचे अश्रू  बनते ! 


ती नानांची मुलगी आहे 

तिच्याही मनातलं समजणं अवघड आहे !

ती लहानपणी हट्टी होती 

ती आजही "अरे हो रे'.. करत 

   आपल्या मतांसाठी हट्टीच आहे ! 


ती मातापित्यांसाठी सेवाव्रत आहे 

ती " न ऐकणाऱ्या खोडसाळ बंड्या ' 

       नानांचे सर्व लाड पुरवती आहे  ..

ती प्रसंगी त्यांची माय असते !

ती पल्लवी  आर्चिसचीहि आय असते ..

ती सासरी प्रिय तर माहेरी आवडती आहे !

ती मकरंदचा मध ( मोहोळ ) आहे... 

ती  मेघनाचा सूर आहे ! 


ती ... आमची  लाडकी सोनपरी 

      धावत येते प्रत्येक सुखदुःखावेळी !

आमची गुड्डी आमचा अभिमान 

आयुष्य लाभो उदंड अन महान ! 


अगस्ती दादा मिनलवहिनी कडून शुभेच्छा !

Thursday, July 29, 2021

ओम जी अग्रवाल

 


तन मन धन सर्वस्व समर्पित
    बने राम का धाम , भव्य राम का नाम !
अवध पुरी मे फिर से मंदिर
        जय जय जय श्रीराम !
     एक महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात रामजन्मभूमी साठी घरोघर फिरणाऱ्या  , समर्पित  रामसेवकामध्ये एक नाव ओमप्रकाश बिहारीलाल अग्रवाल ।
         खरंच ओमभाई ना फक्त सांगा इकडे चेक मिळणार आहे तिकडे काकू पैसे घेऊन तयार आहे ओम भाई तात्काळ पावतीपुस्तक घेऊन हजर .
         रामासाठी असेल , हनुमंताचे मंदिर असेल , प्रकटदिन,  गौरीपूजन असेल अथवा घरची पूजा असेल ओमभाई मनोभावे आपसूक जोडलेले !  कंटाळा दूरपर्यंत नाही .
     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे बऱ्यापैकी नियमित स्वयंसेवक . कट्टर हिंदुत्वअभिमानी , गोमाता रक्षक .
           ओमजीना रात्री 12 वाजता सांगा उद्या भद्रा दर्शनाला जायचेय ओमभाई हजर असणारच .
      भारतीय जनता पक्षाचे दायित्व वॉर्ड अध्यक्ष म्हणून निभावताना आपण एका वॉर्डाचे अध्यक्ष असताना इतरही ठिकाणी मी पक्षाला कशी मदत करू शकतो हे पाहणारे ओमभाई , आम्ही गंमतीने त्यांना जिल्हा वार्डाध्यक्ष म्हणत असतो . पूर्व पश्चिम मध्य सगळ्या मतदारसंघात ओमभाईंचे मित्र भेटतील ....

            व्यवसाय करताना मुळीसुद्धा दुर्लक्ष होणार नाही याची काळजी करत बाकी सर्व व्याप सहज सांभाळणारे ओमभाई , पक्ष ,संघ ,क्लब , सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात .अन वैशिष्ट्य असे की घर गृहस्थी सुद्धा तेवढ्याच ताकदीने पेलवत असतात . स्वतः च्या मुलींना चांगले शिक्षण कसे देता येईल यासोबतच भावांना सुद्धा सोबत घेऊन त्यांच्या सुखदुःखात समरस असतात ....
          मित्र परिवार मोठा जपणारे ओमभाई वॉर्डातल्या समस्यांना सुद्धा उत्तर मिळवत असतात अन त्या साठी पक्षविराहित मैत्रीही जपतात .
                शारीरिक बांधणी पाहता  सगळ्या कामांमध्ये एकदम चंटूकडे कसे राहतात याचेच आश्चर्य . फार क्वचित दुखणे ते ऐकवतात .
                ईश्वर त्यांना असेच " चंट ' ठेवो , त्यांच्या हातून अशीच ईश्वरसेवा घडो , दिर्घ निरामय आयुष्य लाभो अन आम्हालाही अशीच ओमभाईंची  सुसंगती सदा घडो ...या साठी आई जगदंबे चरणी प्रार्थना . प्रार्थनामहें भव शतायु:
                               - मंगलमुर्ती शास्त्री

डॉ अतुल टापर

 आज डॉ रवींद्र तांबोळींच्या सिद्धहस्त लेखणीचा आजचा विषय झालेला ,  सगळ्यांचा भाई असलेला अन माझ्यासाठी मामा म्हणून आमचे पालकत्व निभावलेला , डॉअतुल टापर शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे .

         कुठलेही कांम मन ओतून करणारा आमचा मामा फक्त शासकीय दृष्ट्या निवृत्त असेल ही मला खात्री आहे .बरीच शासकीय मंडळी साठीच्या उंबरठ्यावर मनांनही निवृत्त होतात . ' आता राहिलेच किती आमचे दिवस ' अशी भावना ठेवतात .... व्यापारी नव्वदीलाही नवीन प्रोजेक्ट हाती घेतो .
        मात्र मला खात्री आहे मामा या मोकळे पणाचा फायदा उचलणार अन नवी इंनिंग नव्या जोमाने सुरू करणार मग ते शेतातले प्रयोग असोत का गोठ्यातले , समाज कार्यात असो ! हा शांत बसणार नाही पक्के .
     "अरे अगस्ती  ह्या बाबतीत आपण काही करु शकतो का ?'  म्हणत मलाही बऱ्याच वेळी मामा नी कार्यरत केलेलं ....
    " कामधेनु ' खडकेश्वर ला आणण्यात मामाचा मोठा वाटा आहे . डॉ डोईफोडेनी " डॉ टापर तो बिल्डर तुमच्या जालण्यातला , जरा लक्ष घाला ' अन मामांनी गाळा खरेदी डन करूनच स्वस्थता घेतली त्याकाळी !!
       कम्पनी काढतांना मनात आपले प्रॉडक्ट " अल्लग 'असावेत इनोव्हेटिव्हीव असावेत ही भावना होती अन मामाकडून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा अन अभ्यास झाला अन कंपनीचे उद्दिष्ट सफल झाले . नवनवीन प्रॉडक्ट आणले
इनोव्हेटिव्हीव !!
       अत्यंत आपुलकी अन जिव्हाळा अतुलमामा मामीनी दिला  अगदी खोलापूर पासून ! अन महत्वाचे फ्रेंडली वातावरण ठेवणे अन तेही विशिष्ट मर्यादेत ....
         मिळेल आता दीर्घ मोकळा श्वास निवांत पणाचा
        उद्या न होईल घड्याळासवे हिशेब व्यस्त क्षणांचा ..
हे जरी खरे असले तरी मामांनी निवांत होऊ नये , अविरत आनंदाचा निश्चित व्हावा मात्र कार्य मग्नतेत !! कामात व्यस्त राहिलं की निरामयता आपोआप मिळते .
            मामाच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !

मंगलमुर्ती शास्त्री
सौ मिनल शास्त्री .


    

मित्रवर्य सुरेंद्र

 अन्यायाविरुद्ध  अतिशय पोटतिडकीने लढणारा आमचा मित्र सुरेंद्र कुलकर्णी आज आपला वाढदिवस संपन्न करत आहे .

              कुठलेही काम मनावर घेतले की त्याचा फडशा पाडल्या शिवाय बंधू हटत नाहीत . हे खास वैशिष्ट .

      सुरेंद्र कुलकर्णी , मित्र अनेकांचा ! कुठलेही अगदी सुपरीचेही व्यसन न करता अनगीणत मित्र जमावणारा अन राजकारणात जागा राखणारा क्वचितच एखादा असेल ,  त्यात सुरेंद्र भाऊ पहिल्या नंबरवर ...

         भद्रा मारुतीचा निस्सीम भक्त गेल्या 30वर्षात लोकडोउनचे वर्ष सोडता एकही शनिवार चुकवला नाही असा भक्त !

          कट्टर हिंदुत्व वादी , हिंदूत्वासाठी काहीही करायला
तयार असणारा सुरेंद्र अपक्ष निवडून आल्यावर खूप आमिषं त्यावेळी दिसत असतांना , हिंदुत्वाला जागलेला !!!

             सत्तेसाठी हिंदूत्वाला सध्या पायदळी तुडवणे चाललेले  , नाही नाही ते पक्ष एकत्र येत सत्तांध झालेले दिसतात ,  त्याच्या पार्श्वभूमीवर त्याकाळी सगळ्या आमिषाना अन त्याद्वारे मिळणाऱ्या सत्तेला त्यांनी  लाथ मारलेली . त्याचे हिंदुत्व उजळून निघाले त्या काळी .

       आज वॉर्डातील नागरिकांना खरच पालक वाटावा अश्या प्रकारे दायित्व निभावणारा , सगळ्यांचे सुखदुःख स्वतः चे समजून कार्यरत राहणारा आमचा मित्र .

        आम्ही नशीबवान आहोत असा मित्र आम्हा लाभला .त्याला  निरामय , आंनदी अन तीन आकडी वया साठी भद्रा चरणी प्रार्थना .

शांत व्हाव्या आपदाही
विपदाही मावळाव्या
सूर्य साक्षी जीवनाला
दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा ....

सुरेंद्र भाऊ वाढदिवस शुभकामना !
                               -  मंगलमुर्ती शास्त्री









प्रशांत जन्मदिवस

 


1969 च्या चैत्रातल्या शुक्ल पक्ष द्वितीयेला वसंत बहरत असतांना , अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान होत असतांना असं मनात चुकूनही न आणता , वसंतात अनसिंग जवळ  बहरलेल्या पळसाच्या पालवींच्या , उन्ह अन पन्हाच्या गरम  सोहळ्यात पळसकरांना नातू ,  सुधाकर शास्त्रींना द्वितीय पुत्र प्राप्ती झाली . तारीख होती 20 मार्च !!
             ...आपल्या स्वभावानुरूप त्यांनी त्याकाळी पेढे वाटले असतील असे वाटत नाही , घरीच वरणाला छान फोडणी देत दोस्त मित्रांना जेवू घातले असेल अन या मधल्याचा  जन्मोत्सव केला असेल !!
             आजच एक video ऐकला , ऍलोपथ्य , आयुर्वेदिक, होमिओपॅथी यात फरक काय ?
     जगात तीन टाईपचे लोक रायतेत एलोपॅथिक , आयुर्वेदिक, होमिओपॅथिक !!! आयुर्वेदिक बोलाल्ये लई चांगले पण इमर्जन्सीत काही कामाले येत नाई !
             ऍलोपॅथिक म्हणजे इमर्जन्सीत फास्ट कामात येते , पन त्याचे साईड इफेक्ट डेंजरस , कधी कुठं पोहोचवन सांगता येत नाई !
               होमिओपॅथिक म्हणजे कई कामाचे नसते पण संग असलं का बरं वाटते ... नो ईफेक्ट नो साईड इफेक्ट !!
                तर "सुधा' शास्त्रींचा हा बाल्या , अन  आयुर्वेदावर त्याचा  मुळीच विश्वास नाही ... उरल्या दोनात खेळते तो !! कधी कुठं पोहोचवन .......पण संग असला का बरं वाटते साऱ्याइले !!
              कधी कुणावर पिच्चर काढन सांगता येत नाही ! प्रत्यैकाच नाव यांच्याजवळ तयार आसतं बगा !
               यायच्या हाताले लै चव हाय . उकरपेंडीत लांपणापासून मास्टरकी मिळवली तर आता काळा मसाला याच्याच हातून खावा भौ  . काल सोया कंटकी खाऊ घातली ...दिलखूष !
               हॉटेल बिटल टाकल तर माणसं लै पागल होतील याच्या हातचा मेन्यू खावून !
         लहानपणापासून हुरहुन्नरी असलेल्या प्रशांतला 52वा वाढदिवस सेलिब्रेशनचा जावो  ! 52 बावनचा उल्लेख यासाठी की सुधाकाकाना कळावं की तो आता बाल्या नाही राहिला !!!
           लोकडोऊन मध्ये कंटकी तयार करून सगळ्यांना टेस्ट मिळो ती सोया कंटकी  क्रंची, अन मस्त क्रिस्पी सुद्धा होवो कालच्यासारखी  !! 
              तब्येतीने तो बापावर गेलेला असल्याने टकाटक राहणारच आहे . दीर्घ निरामयता हि ईश्वर देणगी आहेच ... तरीही आमच्या शुभकामना पाठीशी असतीलच नेहमीसाठी !!!  मनःपूर्वक शुभेच्छा -अगस्ती

      

              

Wednesday, July 28, 2021

लाडुबाईस

 परवा तुझे लेकिसोबतचे लहानपणीचे व साखरपुड्याचे असेंफोटो पाहिले.आणि तुझं मन मला माझ्या कवितेत सापडलं.ही कविता खास 


लाडूूबाईस


गुंजे एव्हढा जीव तुझा पानाफुलात रमलेला

आज अचानक कसा मग

आभाळभैरी झालेला


फुलपाखराहून निराळे

आज तुझे हे भिरभिरणे

वाट कोणती फिरून आले

स्वप्न तुझे हे नवेतरणे


आज तुझ्या उर्मीतून उसळे

चैतन्याचे शुद्ध झरे

पंचप्राणातून उभरती

नवोन्मेषाचे शुभ्र तुरे


सालस भोळे गौर कंचनी

रूप तुझे हे लाडूूबाई

गिरकीत तुझिया थिरक नाचरी

नवथर उडण्याची घाई


तुझ्या पुढे आकाश खुले ग

घाल रांगोळी त्या वरती

दहा दिशा तुझ्या सख्या ग

तुझ्या रश्मीने त्या दिपती


       वीणा मालशे अकोला

लाडुबाईस


 

Sunday, July 18, 2021

शिल्पावहिनी 17 जुलै 2021

17 जुलै 2021


मला आठवतं माझं लग्न झाल्यावर आम्ही देवेन्द्राला सी ऑफ करायला मुंबईला  एअरपोर्ट वर होतो .. देवेन्द्र नी एक अपेक्षा वहिनी बाबत व्यक्त केली !

    " मिनू वहिनीला शिल्पा वाहिनीचा आदर्श ठेवायला सांग'


त्याबाबत त्यानं एक पत्रही लिहिले होते ... मिनू वहिनी तू शिल्पा वहिनी बन ! 

           त्या आदर्शानी आज विश्रांती घेतली .  तीर्थरूप भाऊंनी सतत श्यामचा आदर्श ठेवण्यास सांगावे तर देवेन्द्रनी या वहिनीचा मिनूवहिनीला !! 

             शिल्पा होणं कठीण आहे . एक शासकीय अधिकारी वडिलांची साहेबी थाटात वाढलेली मुलगी श्याम नावाच्या जगनिराळ्या साहेबाच्या घरी येते काय अन इथलं वातावरण सांभाळते काय ! 

         फिलॉसॉफीत गोल्ड मिळवणारी अन एमएसीबीच्या अभियंत्यांच्या घरात पाठवणी केलेली शिल्पा वहिनी काय स्वप्न असावीत !!

      इथे अशी रमली का श्यामदादाला शिल्पाशिवाय आठवावे ! आजही श्यामदादा एकटा आम्हाला आठवत नाही ... 

          पिंगळ्यांचं कल्चर माझ्या दृष्टीनं फार किचकट ! ते सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत . घरात येणाऱ्या प्रत्येकाची आवभगत कशी व्हावी याचा परिपाठ आक्का आत्यानी ,  अगदी बेड वर असताना सुद्धा , घालून दिलेला . 

      घरी गुरू महाराजांचे सणवार करायचे तेही नऊ वार घालून , शिल्पानी निभावले सगळे बिन दिक्कत ! 

       मला आठवते कोराडी च्या घरी गेलो होतो सोफा होता त्यावर गाद्या( कुशन) नव्हते .तेव्हाही दादा साहेबच होता ! त्याच्या दृष्टीनं घरात कोठ्या आवश्यक !  एक्क्याला लागतात नं . शिल्पानी कधी तक्रार केली असेल असं वाटत नाही . 

       विरारला असताना गायक अजित कडकडेना रेल्वेत लहानग्या पोरांनी सांगितलं आमची परिस्थिती नाही म्हणून आमच्या कडे टेपरेकॉर्ड नाही अन तेव्हा कुठे (सुपरिटेनडिंग इंजिनिअर !) दादांनी घरात गाणं ऐकायला इलेक्ट्रॉनिक माध्यम विकत घेतले . त्याच्या प्रायारिटीज ठरलेल्या होत्या . उंबरठ्या बाहेरच्या जमा झालेल्या खेटरांचं आकर्षण ! माणसाचं ,  मित्र नाते संबंध वाढवण्यावर त्याचा भर ! सगळ्यांकडची  कार्य , सुखदुःख सांभाळल्याच गेली पाहिजे यावर कटाक्ष !

       सांभाळलं सगळं आमच्या शिल्पावहिणींनी ! 

            देवेन्द्र शिल्पा वहिनी जवळ राहून होता त्यामुळे त्याला तिच्या वागण्या बोलण्याचं कोण कौतुक ! असणे स्वाभाविकही आहे वहिनी होतीच तशी . शांत निगर्वी आवश्यक त्या कष्टांसाठी सदैव तयार . मुलांना कल्पक अन शीतल तिनेच घडवले . 

     आम्हालाच काय पण सर्व नातेवाईकांना श्याम कडे मुक्काम टाकायला कधी संकोच न होण्याचं कारण शिल्पा होती हे सगळे मान्य करतील . दादाच्या यशाच्या सर्वार्थानं भागीदार वहिनी 

           श्यामदादाला त्याच्या सगळ्या व्हीम्स सांभाळणारी , हो ला हो करणारी  वहिनी जरा लवकरच गेली . रांजणगाव च्या गजाननाने तिला उचलले . जो आवडी सर्वांना तो ची आवडे ..ते खरे ठरवले . 


दादाच्या गाण्याच्या पाठीमागचा सपोर्ट , तानपुरा गेला , त्याच्या स्टेजवरच्या अन जीवन रुपी  नाट्यछटांमागचा , पडद्यामागचा  प्रॉम्प्टर , सहकलाकार एक्झिट घेता झाला ..... 


             नियती क्रूर आहे हे मात्र खरेच ! 


दादा कल्पक शीतल याना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो ... 


शिल्पा वहिनीला आदरांजली ! 


अगस्ती मिनल

             

              


Saturday, February 20, 2021

शुभुसाठी काय लिहावं

जलाशयाचे सुटले पाणी
मुक्त , मोकळे ,अथांग आणि
उंदडे , उंडारे उगाच नाही
ऊर्जा ताकद उंची इतुकी
आकाशाला घाली गवसणी



बाप लेकीचं अलौकिक नातं आहे .मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते , बाप आपलं दुःख आईच्या हृदयासमान लेकीला सांगून मन हलकं करत असतो ...बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असत, कारण एका लेकीसाठीही  एका बापालाही वैकुंठाहून परत यावं लागलं होतं !!!
       " तुकोबा - भगिरथी ' नातं उलघडणारी वाक्य  वाचली अन आज  असलेल्या शुभुच्या वाढदिवसाच्या शुभचिंतनासाठीची नाळ सापडली  .... 
          काय लिहावं शुभांगी साठी असा विचार डोक्यात अन वरील लेख !!
       खरंच ज्याला लेक आहे तो बाप भाग्यवान ! मुलीचं प्रेम काय चीज आहे  मी रोज अनुभवतो .... कालच सकाळी


एक तरी मुलगी असावी
जवळ येऊन बसावी
मनातली गुपितं
हळूच कानात सांगावी


एकतरी मुलगी असावी
साजिरी गोजिरी दिसावी
तिच्या मागण्या पुरवताना
माझी तारांबळ उडावी .....




डॉ रवींद्र तांबोळी




तो मनानं चिरतरुण आहे
तो वागण्यानं खट्याळ आहे
तो स्वभावानं मिश्किल आहे
तो लेखनीनं कवी आहे
तो वाणीनं मधुर आहे
तो शब्दांचा जादूगार आहे
तो वृत्तीनं दिलदार आहे
तो कवी प्रतिभावान आहे
तो मित्र म्हणून हवाहवासा आहे
सगळ्यात महत्वाचे
तो वयानं जेष्ठ असला तरी
तो अस्मादिकांचा मित्र आहे . ...
तो डॉ रविंद तांबोळी आहे
आज त्याचा वाढदिवस आहे
करिता आमच्या दीर्घायुष्य अन
निरामयतेसाठी अनेक   शुभेच्छा आहेत  !
-मंगलमुर्ती शास्त्री 

नाना @81

नाना  !
एक हजार पौर्णिमेच्या कुळाचाराच
भाग्य ज्यानी मिळवलं असे नाना .
सहस्त्र चंद्र दर्शन योगी नाना ।
शास्त्रींच्या मागच्या पिढीतले शेंडेफळ नाना !
लाड तर अपेक्षितच , तरीही स्वतःला
जमिनीवर ठेवणारे नाना .
अर्न अँड लर्न
स्वतः चे शिक्षण स्वतः कमवून करणारे नाना .
मागच्या पिढीतला पहिला ग्रॅज्युएट !!
घरात सगळ्यात मोठया पासून लहानांनाही
दिशा देणारे नाना .
सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावणारे नाना
असलेल्या तोकड्या  पगारातही संसार सुखाचा
करणारे ते नानांच !
चांदीच्या लोटीचे कौतुक आयुष्यभर  जपणारे नाना ।
तोकडा पगार म्हणून कुणाकडे हात पसरवण्या पासून
दूर राहणारे  ते नानांच .
पगाराचे नियोजन असे की त्या तुटपुंज्या पगारात कैक लोकांना आर्थिक मदत निकडीच्या  वेळी उभी करणारे सुद्धा
नानांच !
समाजात वावरताना सामाजिक कार्यात हिरिरीने समोर असणारे ते नानाच .
जेष्ठ नागरिकांच्या कष्टीक चेहऱ्यावर हसू आणणारे नानांच .
तर शाल जोडीतले मारत कनिष्ठांकडून काम
करवून घेणारेही नानाच !
आपल्या व्यायामात खंड कधी पडू न देणारे ते नाना !
अन एक्यांशीव्या वर्षी ऑपरेशन नन्तर , काठीच्या आधाराला नाकारणारे नानाच !
दत्तभक्ती एव्हढी की जयंतीनिमित्त चे पारायण त्याच जोमानं तब्येतीत पूर्ण करू जाणारे ते नानांच !
कर्तव्याबाबतीत हट्टी कुणी असेल तर नानांच !
शिस्तwबद्ध नाना , कर्तव्य कठोर नाना !
प्रेमळ नाना , मैत्र प्रिय नाना !
आपल्याला सहस्त्र चंद्र दर्शन शुभंकर होवो .







हास मिले या त्रास मिले
विश्वास मिले या फास मिले
किंतु कामना एक यही बस
प्रतिपल पग गतिमान चाहीये




मनसा सततं स्मरणीयम
वचसा सततं वंदनीयम
लोकहितं मम करणीयम


दुःख सागरे तरणीयम
कष्ट पर्वते चरणीयम
विपत्ती विपीने भ्रमनीयम
लोकहितम मम करनीयम

छोटी



लॉक डाऊन च्या काळात बापाला  रुग्णालयात ऍडमिट
केलेलं ! गावात रस्त्यावरून पोलीस हलू देईनात , अन सकाळा चार वाजताच एक धाडसी बाई बापाच्या तब्यतीसाठी एकटी टॅक्सी मध्ये पोहचते ... बापाला बाळासारखं सांभाळणं !!
      स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !

नावालाच छोटी !

नवऱ्याला कॅन्सर डिटेक्ट होतो , या दवाखान्यातून त्या दवाखान्यात , डॉक्टर  , हॉस्पिटल , औषधी आणि तरीही नवऱ्याला बाळासारखं सांभाळणं !
          स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !

नावालाच छोटी !

       लॉक डाऊन आहे , मुलाला अभ्यासात ड्राय फ्रुटस ची बेगमी संपलेली ! पोरासाठीची मर मर ...गंगापूर हुन पार्सल पाठवायचे , घराबाहेर तर पडणे नाही ..बँकेच्या कर्मचाऱ्याला पकडून पार्सल पोचवण्याचा आटापिटा करणे , पोरांची मजबूत परवरीश करत
          स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !

नावालाच छोटी !

         लॉक डाऊन मध्ये टोल नाक्यावर पोलिसांनी गाडी अडवलेली ! मुलीला सासरी पाठवण्यासाठीचा आटापिटा चाललेला . ड्रायव्हर नी पटवापटवी करण्याचा प्रयत्न करत असताना त्या पोलिसाला त्याच्या कलीग कडून फोन येतो , अन तो गाडी सोडतो .... मैत्रिणीच्या पोलीस खात्यातील नातेवाईकाला ताबडतोब कामाला लावत....
        स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !

नावालाच छोटी !
                 कर्तृत्वानं मोठी  असलेल्या आमच्या या छोट्या बहिनाईला लक्ष लक्ष शुभाशीर्वाद अन शुभेच्छा !

- अगस्ती








 

डॉ डावरे

डॉ रवींद्र डावरे ,

माझी पहिली भेट परभणी जिल्ह्यातील  बोरीला झालेली . पहिल्याच भेटीत मित्र बनवणारा हा ग्रेट  माणुस ! त्यांनतर आता तीस वर्षे झाले , डॉक्टरांनी आपल्या मैत्री बंधनात जखडून ठेवले ...

    मित्र पण असे जोडलेले की वेगवेगळ्या प्रांतात काम करणारे . यांचा मित्रसंचय अगदी हेवा वाटावा असा . त्यांच्या मुळे अस्मादिकांना ही बरीच मित्र लाभली .

           सतत हसतमुख चेहरा ठेवणारे डॉक्टर कुठल्याही कामात अग्रेसर ! डॉक्टर असा कॅम्प घ्यायचा का विचारायचा अवकाश की डॉक्टर स्वतः fallow up घेऊन पूर्णत्वाला नेणार ! वेगबेगळ्या सामाजिक कामात डॉक्टर मदतीला नेहमी  तयार असतात .

           हसतमुख चेहरा चैतन्याने ओतप्रोत फिझिक असं काही मेंटन केलाय कि अजूनही त्यांना "निवृत्त' जोडतांना हात थरथरावेत .


          बस असेच आयुष्य दीर्घ तर असावेच निरामय सुद्धा !
आई जगदंबे चरणी प्रार्थना - मंगलमूर्ती शास्त्री
     




साला मै तो साब बन गया

 


साला मैं तो साहब बन गया अरे,
साला मैं तो तो साहब बन गया,
हैं रे, साहब बनके कैसा तन गया
ये बूट मेरा देखो, ये सूट मेरा देखो
जैसा गोरा कोई लनढन का, हा!
            अशा अविर्भावात कुणीही नाचलं असतं जर साहेब म्हणून बढती शासनाने दिली असती ...पण बढती नितीन देवाना मिळाली तर क्वचितच त्यांनी ती शेअर केली असती ...नाचणे तर दूरच राहिले !!
           आमच्या पिढीला ग्याझेंटेड ऑफिसर म्हणजे काय माहिती नाही .त्यात शासकीय नोकऱ्या पासून आम्ही वंचित ! त्यातल्या त्यात एखादं दुसरे अधिकारी झालेले ..  त्यात नितीन देव ...देवा देवा !

तर आमचा नितीन डेप्युटी इंजिनिअर झाला ! त्रिवार अभिनंदन !


"नितीनरावांना दे बरं फोन त्यांना विश करतो '
" तुझ्या तोंडून राव वगैरे चांगले नाही वाटत ..
तू नितीनच म्हण जवळीक साधल्या जाते.. ' 
हो राणी पती नितीन आमचे लग्नापूर्वी पासूनचे मित्र ! बहीणजावई झाल्याने त्यांना कधी राव चिकटले नाही , जसे गणेश पदे ! यांना आम्ही "  अरे तुरे ' तच ठेवलेले . दोस्त कधीही नातेवाईकांनपेक्षा अधिकच जवळचे असतात . ..
    तर असे हे जावई ..  अधिकाराने "जा वाया' सारखे कधी वाया न गेलेले , शिस्तीतले आयुष्य  जगलेले नितीन देव !
      आज आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब म्हणजे आमचा नितीन आता साहेब झाला ! नितीन देव डेप्युटी इंजिनिअर म्हणून बढती मिळवता झाला . आजच्या आरक्षण  परिपेक्ष नितीन वर नवी जबाबदारी येणे खरच आनंदाची बाब आहे .
        मला माहित आहे नितीनला याचे अप्रूप मुळीच नाही किंबहुना " स्केल तर कधीचीच लागू झालेली .आता नव्या कटकटी 'असा भाव सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर शक्य आहे .
     मला आठवते स्व भाऊंचे प्रमोशन .यवतमाळ ला प्रमोशन मिळाले त्यांनतर आम्ही जायकवाडी ला आलो अन देवकाका मिळाले ...अन देव कुटुंब आमचे झाले . राणी मुळे नात्यात परिवर्तीत झाले .
      खरे तर मला नोकरी करणारेच आवडत नव्हते तेव्हाही अन आताही . त्यात नितीन नी बिल्डर शिप सोडून नोकरी जॉईन करणे मी विरोधच केला होता पण तात्या भाऊ च्या विचाराने नितीन जॉईन झाला .आज किमान त्या निर्णयाचे चीज झाले .
              आज भाऊंना नक्कीच आंनद झाला असता नागपुरात जाऊन सेलेब्रशन झाले असते .एकतर नितीनचे भारी कौतुक अन त्याबरोबर त्याची कौतुकी बायको . असो

नितीन अतिशय सहृदयी , घरातला सायलेंट प्लेयर,  (...घरात कुणीतरी असावा लागतो ! ) फास्ट (याच्या स्कुटर वर मागच्या सीट वर बसा ....एस्सेल वर्ल्ड चा अनुभव मिळेल ..... भरभर उरक असलेला , न बोलता खूप काही अचिव्ह करणारा ....
            नितीन खूप खूप अभिनंदन . आणिक यशासाठी शुभेच्छा . राणी ,श्रेयस, तेजा तुमचेही अभिनंदन मनःपूर्वक !!


                                                 -अगस्ती
     
       

यावर चर्चा झालीच पाहिजे

 यावर चर्चा झाली पाहिजे ...


        मला माझ्या अत्यंत आवडत्या व्यक्ती विषयी आदर सन्मान  मिळवायचा असेल तर पहिले मला काय केले पाहिजे किमान  आदरपूर्वक उच्चारण करावे लागेल .

           तुम्हाला उगाच कुणी सन्मान देत नाही ! मी माझ्या पत्नी बद्दल बोलतोय . बायकोचा उल्लेख एकेरीत , त्यातही तुम्ही कौलखेड /वऱ्हाड मध्ये आयुष्य घालवलेले असेल तर ... बायकोचा सतत लोकांसमोर अपमान जनक उल्लेख करण्यातच धन्यता !  नवरोजी बाहेर काही का तिर मारे ना घरात घुर्र घुर्र ....बायको समोर फक्त !!!

         मी कोविड पेशन्ट असतांना मला आलेल्या एका फोन ने मला विचार करायला बाध्य केले . तो फोन होता भवाणीपंताचा . आपल्या सौ बद्दल बोलतांना त्यांनी ...तिचा तिला असा उल्लेख न करता त्यांचा प्रवेश  , त्यांच कॉलेज अशा प्रकारे  उल्लेख मला भावला .
            मी रसिकाला फोन करून विचारले तुला घरातही अहो जावो घालतात का ? तिचं उत्तर होतं "इतरांसमोर !'
          मला एक श्रीमंत संस्कृती ( रिच हेरिटेज )कशी जपल्या जाते हे .... या वयात माहिती झाले .आम्ही कितीही अंमलात आणू म्हटले तरी आता शक्य नाही . आम्हीच बायकोला सन्मान देत नसू तर इतर लोकं त्याच पद्धतीने तिचा योग्य (?) सन्मान केल्याशिवाय रहात नाहीत .

     आजकाल तर नवऱ्याला पोरी अरे तुरे करतात , पोरींचे मायबाप तर  त्याउपर असतात .अन मग जावयाचे घरी पायपुसने होते ! कुणीही या पाय पुसून जा ....

          नवऱ्याला बायकोनं रेस्पेक्ट मिळवून द्यावा तद्वतच नवऱ्यानं बायकोला ....आणि म्हणून पंत मला भावले !   दत्ताच पुण्य खरंच कामात आलं .  जावई माझा भला !!!

पुष्कर राव वाढदिवस चिरायू होवो !
    आपणाशी गेल्या आठवड्यात संवाद साधताना आनंद झाला . तुम्ही सौ गिरीजा बद्दल बोलतांना एकेरी भाषेत न बोलता ज्या पद्धतीने सौ गिरीजा उर्फ रसिकाचा उल्लेख केलात मला अतिशय आवडले !
         दीर्घ निरामय यशस्वी आयुष्याच्या शुभकामना अगस्ती काका कडून !
     अगस्ती थोडा ऑर्थोडोक्स होत असेल विचारानं मात्र ...

चर्चा व्हायलाच पाहिजे !!!!









             




पाल्हाळाचे कारण की

 


परवा आशीर्वाद , शुभेच्छा देण्यासाठी ति शामदादांचा फोन आला , बोलतांना आज काय उपक्रम वाढदिवसाप्रीत्यर्थ ?  विचारणे झाले .. काही नाही शेगाव कचोऱ्या अन बर्फी यावरच यावर्षी शुभेच्छा देणाऱ्यांची बोळवण आहे म्हणणार ..तर लक्षात आले दादांना काय सामाजिक उपक्रम अपेक्षित असेल ...
       यंदा वाढदिवस साजरा न करता बाहेर पळायचा उपक्रम होता खरे तर . नरसोबावाडी ठरलेही होते , बाबीताई जाऊनही आली आमच्या ड्रायव्हर साहेबांनी दांडी मारली अन आम्हाला 11 जानेवारी साजरी करणे आले . ..
        इथेच असल्याने आमच्या कार्यकर्त्यांनी दोनशे शेगाव कचोऱ्या , स्वीट वगैरे च्या पावत्या अस्मादिकांच्या नावाने फाडून ठेवलेल्या . थोडक्यात निभावले ( करोना लाभार्थी ! )

तर पाल्हाळाचे सविनय कारण की दादांनी कन्याकुमारी शिला स्मारकासाठीच्या स्व.  एकनाथजी रानडे यांच्या एक रुपया समर्पणाची गोष्ट सांगितली . साठ च्या दशकातील पूर्वार्धात असेल शिलास्मारकासाठी शामदादांच्या पिताश्रींनी म्हणजे आपल्या श्रीराम पंतांनी मलकापूरला चार मुलांच्या नावाने 44 रुपयांची कुंपणे त्या काळी घेऊन विवेकानंद शिला स्मारकासाठी आपले योगदान दिले होते . त्यात काय  विशेष ? वाटेल आपल्याला .
        मात्र 164 रुपये पगारातून अन घरी स्वतःची , भाऊबंदाची दहा तोंडं भरवायची असतांना त्या 44 चे महत्व कळते . शेजारच्या त्याकाळच्या लक्षाधीश चांडक सेठचे 1001चे समर्पण त्यापुढे फिके पडावे असे .
       पंतांना त्यांच्या आयुष्यात शिलास्मारक पोरांनी दाखवले का हा अवघड प्रश्न श्याम दादांना विचारायचा राहिला . पण अख्ख्या पिंगळे कुटुंबासाठी हा अभिमानाचा निश्चित विषय आहे की शिलास्मारकासाठी त्यांचे योगदान आहेच .
            तर सांगायचा मूळ  मुद्दा , वाढदिवसा प्रित्यर्थ श्री राम जन्मभूमी न्यासाला माझे योगदान , स्थानिक राम मंदिराला (पाच हजार )योगदान अन वेद पाठशाळेतील गोशाळेसाठी वैरण असे काही विषय मी केले . मी अकरा हजाराचा राम जन्मभूमीचा पहिला चेक सुपूर्द केला आणि माझ्या सासूबाई श्रीमती सुरेखाताई मोहरील यांनी राहुलच्या वाढदिवस पाच हजार देऊन संपन्न केला .
         काल एका वाढदिवसाला (दत्ताजी दंडवळकर ) हजेरी लावली पाच हजाराचा चेक समर्पण मिळाले .

        आता समर्पण निधी अभियान येत्या 15 तारखेला सुरू होत आहे आपल्या नातेवाईक मंडळींनी मागे राहू नये . मी पंतांसारखे अगदी मासिक आमदणीच्या 25 टक्के वगैरे देऊन उगाच " श्रीराम पंत "  बना म्हणणार नाही , परंतु 100 रुपये का होई ना दया . ईश्वरी कार्य आहे तिथे पैसा कमी पडणार नाही मात्र माझेही योगदान असलेच पाहिजे खारीचा वाटा ..... आणि हो जमल्यास आपलं योगदान मधुघट वर टाकल्यास इतरांना प्रेरणा जरूर मिळेल !
  
श्याम दादा धन्यवाद .

अगस्ती 
      

दादामामाचा वाढ दिवस

दादामामाचा वाढ दिवस आज !
सुनीलमामानी यथोचित वर्णन
दादा म्हणून केले ,
मात्र मामा म्हणून राहिलेले ,
करिता लेखन प्रपंच .
लहानपणा पासून दादामामाला अनुभवतोय !
मला पहिल्यांदा अशोका हॉटेल दावणारा,
तसेच माझे चड्डीवरून पॅन्टवर प्रमोशन करणाराही दादामामाच .ह्या वल्लीचं वर्णन करायचे तर म्हणावे लागेल ..

अवघे पाऊणशे वयमान !

तोच जोम अन तीच फुर्ती
उत्साह ,उमेद अन चैतन्य मूर्ती
वळवळ तीच अन तीच चळवळ ,
तीच प्रीत अन तीच कळवळ ,
गाठले ..
अवघे पाऊणशे वयमान !

दयार्द "तो'च अन तीच आर्तही
दुःख कष्ट मग किती कसेही !
खडू असो वा असो फावडे
निश्चयदृढता सर्वां आवडे ...
ओलांडले  ....
अवघे पाऊणशे वयमान



इच्छा दृढ अन शक्ती जोम ही
श्रद्धा तीच अन सेवा पुज्यही
तेच काळेश्वर अन तोच कोठेंश्वर
परीक्षेसही  तोच ईश्वर !
उरकले ...
अवघे पाऊणशे वयमान !

        "दादामामा आता म्हातारा झाला' म्हटले तर सगळे माझ्यावर धावून यावेत असेच चिरतारुण्य मामाश्रींना  लाभले.  कोठेंश्वरा अशीच शतकी सेवा तुझी , मामाकडून करून घे . आंनद,  निरामयता , चैतन्य कुठे कमी पडू देऊ नकोस ... इतकंच मागणं अगस्तीकडून !!