पानं

Sunday, July 18, 2021

शिल्पावहिनी 17 जुलै 2021

17 जुलै 2021


मला आठवतं माझं लग्न झाल्यावर आम्ही देवेन्द्राला सी ऑफ करायला मुंबईला  एअरपोर्ट वर होतो .. देवेन्द्र नी एक अपेक्षा वहिनी बाबत व्यक्त केली !

    " मिनू वहिनीला शिल्पा वाहिनीचा आदर्श ठेवायला सांग'


त्याबाबत त्यानं एक पत्रही लिहिले होते ... मिनू वहिनी तू शिल्पा वहिनी बन ! 

           त्या आदर्शानी आज विश्रांती घेतली .  तीर्थरूप भाऊंनी सतत श्यामचा आदर्श ठेवण्यास सांगावे तर देवेन्द्रनी या वहिनीचा मिनूवहिनीला !! 

             शिल्पा होणं कठीण आहे . एक शासकीय अधिकारी वडिलांची साहेबी थाटात वाढलेली मुलगी श्याम नावाच्या जगनिराळ्या साहेबाच्या घरी येते काय अन इथलं वातावरण सांभाळते काय ! 

         फिलॉसॉफीत गोल्ड मिळवणारी अन एमएसीबीच्या अभियंत्यांच्या घरात पाठवणी केलेली शिल्पा वहिनी काय स्वप्न असावीत !!

      इथे अशी रमली का श्यामदादाला शिल्पाशिवाय आठवावे ! आजही श्यामदादा एकटा आम्हाला आठवत नाही ... 

          पिंगळ्यांचं कल्चर माझ्या दृष्टीनं फार किचकट ! ते सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत . घरात येणाऱ्या प्रत्येकाची आवभगत कशी व्हावी याचा परिपाठ आक्का आत्यानी ,  अगदी बेड वर असताना सुद्धा , घालून दिलेला . 

      घरी गुरू महाराजांचे सणवार करायचे तेही नऊ वार घालून , शिल्पानी निभावले सगळे बिन दिक्कत ! 

       मला आठवते कोराडी च्या घरी गेलो होतो सोफा होता त्यावर गाद्या( कुशन) नव्हते .तेव्हाही दादा साहेबच होता ! त्याच्या दृष्टीनं घरात कोठ्या आवश्यक !  एक्क्याला लागतात नं . शिल्पानी कधी तक्रार केली असेल असं वाटत नाही . 

       विरारला असताना गायक अजित कडकडेना रेल्वेत लहानग्या पोरांनी सांगितलं आमची परिस्थिती नाही म्हणून आमच्या कडे टेपरेकॉर्ड नाही अन तेव्हा कुठे (सुपरिटेनडिंग इंजिनिअर !) दादांनी घरात गाणं ऐकायला इलेक्ट्रॉनिक माध्यम विकत घेतले . त्याच्या प्रायारिटीज ठरलेल्या होत्या . उंबरठ्या बाहेरच्या जमा झालेल्या खेटरांचं आकर्षण ! माणसाचं ,  मित्र नाते संबंध वाढवण्यावर त्याचा भर ! सगळ्यांकडची  कार्य , सुखदुःख सांभाळल्याच गेली पाहिजे यावर कटाक्ष !

       सांभाळलं सगळं आमच्या शिल्पावहिणींनी ! 

            देवेन्द्र शिल्पा वहिनी जवळ राहून होता त्यामुळे त्याला तिच्या वागण्या बोलण्याचं कोण कौतुक ! असणे स्वाभाविकही आहे वहिनी होतीच तशी . शांत निगर्वी आवश्यक त्या कष्टांसाठी सदैव तयार . मुलांना कल्पक अन शीतल तिनेच घडवले . 

     आम्हालाच काय पण सर्व नातेवाईकांना श्याम कडे मुक्काम टाकायला कधी संकोच न होण्याचं कारण शिल्पा होती हे सगळे मान्य करतील . दादाच्या यशाच्या सर्वार्थानं भागीदार वहिनी 

           श्यामदादाला त्याच्या सगळ्या व्हीम्स सांभाळणारी , हो ला हो करणारी  वहिनी जरा लवकरच गेली . रांजणगाव च्या गजाननाने तिला उचलले . जो आवडी सर्वांना तो ची आवडे ..ते खरे ठरवले . 


दादाच्या गाण्याच्या पाठीमागचा सपोर्ट , तानपुरा गेला , त्याच्या स्टेजवरच्या अन जीवन रुपी  नाट्यछटांमागचा , पडद्यामागचा  प्रॉम्प्टर , सहकलाकार एक्झिट घेता झाला ..... 


             नियती क्रूर आहे हे मात्र खरेच ! 


दादा कल्पक शीतल याना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो ... 


शिल्पा वहिनीला आदरांजली ! 


अगस्ती मिनल

             

              


No comments:

Post a Comment