पानं

Tuesday, May 5, 2026

सुरेखा वहिनी

 कधी आई ,कधी ताई ,

….. कधी सुजाण पत्नी 

सो..स..त सारं काही 

झटली एकांगी..

सभोवती हसु 

निर्माण करण्यासाठी .. 

वडिलोपार्जित सुसंस्कृत,

हसतमुख,

मृदु भाषी , 

मवाळ पण … 

झगडली कुटुंब कल्याणासाठी ! 

उंबरठा ओलांडला तेव्हा 

कुठं माहीत होतं 

का आकाशाशी भिडायचं आहे !

सगळी त्रेधा तिरपट लिहिलेली..

अश्रुंच्या महापुरात 

स्वतःची नाव सावरायची आहे !

स्व कर्तृत्वाने नवी ओळख घडवायची आहे 

प्रेमळ पतीच्या संगतीने … 

प्रतिकूलतेला शांत करायचंय !

अनुकूलतेनं नुकतच कुठे कवेत घेतलं ..

तिनं यशस्वी मात दिलीचं अन 

स्वभाव आता आयता झगडालू झालाय तर..

झगडू या उर्वरीत आयुष्यातही !

मात्र यशस्वी होण्यासाठीच …

यश रेखाटलेय तिच्या भाळी 

सुरेखा नावाने  ! 


प्रार्थयामहे भव शतायुषी,

ईश्वरः सदा त्वां च रक्षतु


वहिनी मनापासून शुभेच्छा !


-  मिनल , अगस्ती

Sunday, January 25, 2026

सुधाकाका @88 !

 सुधाकाका @88 ! 

डॉ सुधाकर रे.शास्त्री …

एव्हाना डॉक्टर ते आहेत हे बहुतांश सर्व नातेवाईक विसरले असावे अगदी स्वत: सुधाकाकांसकट !! 

मुक्या प्राण्यांवर न बोलता ट्रीटमेंट करणारे डॉक्टर बोलक्यांना हळूच हवेहवेसे कसे नकळत करून घेतात , काय गूढ रसायन आहे या माणसात कळत नाही ! 

इंग्रजी पार्थ पासून देशी पार्थापर्यंत सगळ्यांना पट्ट्यापट्याच्या चड्डीवरील ‘एक हडकुळा ‘ आमचा काका,कुणाचा बावा, कुणाचा आजोबा आणि ….खरेतर आजच्या भौतिक सुखाच्या मागे असणाऱ्या जगात,  वयानुरूप “डस्टबीन’च्या संबोधनात ज्यांची हेटाळणी सहज अपेक्षित आहे ….  अशा कुणाच्या मामंजीच्या भूमिकेत असणाऱ्या या काकांनी कुठले फेविकोल पिले असावे की सगळे यांच्या घोळक्यात चिपकून राहतात …

    …. यांनी केलेले वरण वाट्यांनी ओरपतात, घरीच सगळे उभे आडवे मिळेल त्या जागेत यांच्या सभोवती असतात ! अगदी नकोनकोश्यांना सुद्धा हे हवेहवेसे कसे होऊ शकतात बरं ! यांचं रासायनिक पृथक्करण व्हायला पाहिजे नक्कीच !

       सुधा काकांच फिजिक मला आठवत तेव्हापासून काहीच बदलेलं नाही ।जसं च्या तस…. तेच ओबडधोबड, वजनात ग्रॅमचाही फरक येणार नाही याची काळजी घेत माझ्या शब्दात “चिवडचावड ‘ करत पोटात ढकलेलं अन्न यांच्या अंगी कधी लागलेच नाही …. नसता अस्मादिक दर आठवड्याला ? दिवसाला म्हणा किंवा प्रत्येक वेळी वजन घेताना किलोकिलोनच वाढलेले !!! 

        यांच्या कडून बाहेर पार्टी घेण्याच्या नादात यांच्ये कैक मित्र धारातीर्थी पडले असतील आमची काय बिशाद … घरी या अगतस्वागत,अगत्याने  नुसत्या उकरपेंडीच्या अन घरच्याच कांद्या पोह्याने ह्या माणसाने किती मोठं गोत तयार केलय  .. आम्ही विस्मित आहोत … 

      सुधा काका तस पाहिलं तर माझा लहाना काका खरतर आमचं नातं अरे तुरे चे… मात्र शास्त्री परिवाराच्या रिवाजा नुसार ते दूर गेलेलं… अहो जाहो किंवा “तुम्ही आम्ही ‘ वर  ! परंतु सुधा काकानी दूर जाऊ दिले नाही ..आई भाऊंच्या जलद बाजीने लवकरच्या एग्जिट ने आम्हाला त्यांच्या रिकाम्या जागा भरायच्याच होत्या आम्ही नशीबवान… अनेक उत्तरं मिळाली त्यात सुधा काकानी उत्तर समृद्ध केले. भाऊंचा सुध्या , विसराळू सुध्या … आमची नावं लक्षात ठेवता झाला… मायेन प्रेमाने आम्हाला समृद्धी दिली.आम्ही 

प्रभ्याची लेकरं पोरके झालो नाही आणि खात्री आहे सुध्या अजून आमच्या एग्जिट (प्रशांतच्या भाषेत) पर्यंत पोरकं करणार नाही ….


काका आपल्या दीर्घायुष्या साठी रेणुकेचरणी प्रार्थना 

       



अगस्ती

Saturday, July 26, 2025

आला सहस्त्र दर्शना चंद्रा असा गाजवू नकोस

 आक्का 

श्रीमती शांता सरदेशपांडे आमच्या अक्काचं आजीचं “ सहस्त्र चंद्र दर्शन ‘ कार्यक्रमाला खुद्द चंद्रच कार्यक्रमात सहभागी झाला अन त्याचं कुणी कौतुक करत नव्हतं म्हणून तॊ कंटाळून चीड चीड करायला लागला! !! कौतुक फक्त अक्काचंच होणारं ,. मग चंद्राच काय ?  त्याला समजवाण्यासाठी 👇 

अक्काआजीचं कौतुक यासाठी की भावाबहिनींच्या लेकरांना त्यांच्या नातवाना प्रचंड माया लावली.  होतं नव्हतं ते सगळं त्यांच्यावर उधळून टाकलं स्वतःला विसरून ! !!! अन मग उस्फुर्त सोहळा पार पडला खोलापुरात .  संत अच्युत महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या अविस्मरणीय कार्यक्रमाला म्हटलेली रचना. ....


आला सहस्त्र दर्शना 

चंद्रा असा गाजवू नकोस !

गेला एक डाग पुसल्या 

चंद्रा असा माजू नकोस !!


पुण्य जर का हवे तूला तर 

फक्त थांबून पाहू नकोस 

धवल व्हावे वाटे तुला जर 

कोर टाकून जाऊ नकोस 


डाग असता अनेक पुसण्या ,

आहे किती “सहस्त्र ‘गाठायचे 

आक्का खपेल तुझ्याही साठी 

घे दर्शन किती तु घ्यायचे! !!!


आम्ही पुण्यवान समजतो स्वतःला 

समजले का आत्ता तुला 

आम्ही कृतार्थ समजतो स्वतःला 

उमजले का आत्ता तुला 


अरे , हजार दर्शन मिळण्याला 

दिवस एक पुरे आम्हाला 

अरे सहस्त्र दर्शन लाभण्याला 

अंशी वर्ष अपुरे तुला ! !!!


अरे ,शांत शितल चांदण्याला 

पौर्णिमेचीच रात्र तुला 

अरे, नितांत नितळ नंदणाला 

आख्खे आयुष्य अक्का आम्हाला 


अरे कद्रू किती ? म्हणताच ,

राग तुला हा कसा रे येतो  !

अरे,  सूर्याचेचं तेज वाहतो 

तेही पूर्ण रे तु ना वाटतो 


अरे शांत शितल करण्या नावे 

सूर्य तेज गिळतो कसा 

अरे, जाऊन ताकासाठीच गावे 

भांडे तु लपवितो कसा 


काहीच कसे ना शिकला 

तु रे अक्का कडून चंद्रा 

जे जे मिळविले ते जीवणी 

घालून भर त्या वाट चंद्रा 


पहिल्या सहस्त्र दर्शनाला 

कंटाळून कसे चालेल चंद्रा 

आक्का तुझ्या शुभ्रते स्तव 

कष्ट ते किती झेलेल चंद्रा 


अरे भोळी भाबडी आमची आक्का 

घेऊ नको तु फायदा 

अरे पुढच्या “सहस्त्र ‘ दर्शनांसाठी 

देऊन टाक तु वायदा ! !!!!!!


Saturday, July 19, 2025

दादा आमचे गुरु इंदोर

 एकदा ईश्वराकडे मागणं. .

तुझा सहवास दीर्घकाळ हवाय! 

त्यानं गुरु कडे बोट दाखवलं 

गुरूंच्या जवळ रहा 

माझ्यापर्यंतचा मार्ग तिकडेच आहे

माझ्यापर्यंत पोहोचायचंय?

मग गुरु हीच वाट आहे.”

गुरु म्हणजे प्रकाशाचा स्रोत,

अज्ञानाचा नाश करणारा.

गुरु म्हणजेच ब्रह्मस्वरूप –

     ईश्वराच्या साक्षात दर्शनाची पहिली पायरी.

गुरु जवळ रहा, गुरूंची सेवा कर !!

गुरु सेवेचं ठरवलं....

जास्तीत जास्त सहवासाचंही 

भाग्य लागतं !!


अमृतायुषी भाग्य ‘


देवानं ऐकलं दादांना धाडलं! 

दादा

आमचे पाहिले गुरु 

निर्लोभ, निःस्वार्थ,निःस्पृह,निर्मोही

सचोटी सत्यनिष्ठा सदाचरण

सगळं कसं भरभरून दिलंत. .

आमची ओंजळ तुडुंब...

शिस्त, सेवाभाव, नि प्रेमाची गाथा...

तुमचं आयुष्य म्हणजे जगण्याची दिशा।

दादा 

तुमच्या हातात संस्कारांची वीण,

प्रामाणिकतेचीच  वाजविली बीन ।

सामाजिक कार्यांची भक्कम शिडी,

तुम्ही उभारली नितिनिष्ठ गढी ।


आता इतकंच मागणं पुन्हा. ..

दादांच्या आशीर्वादाची तिजोरी 

रीती होऊच नये कधी. .. 


दादा 

संपूच नये सुरूच रहावा

                 तुमचाआमचा प्रवास,

प्रेरणादायी, शांत, दीर्घ

                    नि ध्यासयुक्त श्वास।


“अमृतायुषी शुभकामना ”

(९८व्या वाढदिवसानिमित्त)


अलका प्रमोद अर्चना

Wednesday, July 16, 2025

कुसुम मावशी इंदूर

 त्या सुरकुतल्या 

हाताचा स्पर्श

अन शब्दावाचूनही 

समजणारी ती भाषा  

फक्त त्या हातालाच जमते !


ते हात तो स्पर्श 

.... मायेचं आभाळ,

कधी थरथरतं, 

कधी आधार देतं ,

सत्व, श्रद्धा, श्रमाची गाथा

प्रत्येक रेषेतून उमटवतं .


होय तेच हात 

माझ्यासाठीची शिदोरी 

अंगावर चादर ओढणारी 

थंडीतली उब सुद्धा ! !!


सोन्याची अंगठी 

नव्हती त्याच्यावर बहुदा 

पण सोन्याहून 

भारी आहे ती माया,

जगाच्या गर्दीत हरवलेला मी, 

त्या स्पर्शातच अनुभवलं 

......  खरं सुख अन साया  


त्या सुरकुतल्या 

हातांचा स्पर्श

नुसता आठवला 

तरी डोळे भरावं 

प्रेम, त्याग, 

आणि काळजीचं रूप

त्या एकट्या हातातून दिसावं ! !! 


*ताई*

तुझे सुरकुतले हात 

असेच राहू दे  डोक्यावर 

वर्षानुवर्षे . ..

जगण्यासाठीच्या 

 आशीर्वादाची 

सावली असावी अशी ! !!




इंदूरहून निघताना *कुसुम मावशी* नी चेहऱ्यावरून हात फिरवला डोक्यावर हात ठेवला  अन तो अनमोल मातृ स्पर्श. ... 

खुप काही सांगून गेला न बोलता ☝️. 


मावशीला घरी सगळे “ताई‘  संबोधतात.....

Wednesday, March 26, 2025

स्मृती वाढदिवस

 स्मृती दिवसाच्या प्रवीण शास्त्री कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा !! 

सगळ्या गोष्टी जागच्या जागी मिळो यासाठी सदिच्छा . . . आजच्या या शुभ दिवसाची नवरोबाना आठवण राहो !  किमान वाढदिवसाच्या निमित्ताने कोणकोणते दिवे स्मृतीने लावले त्याचे त्याला स्मरण होवो. ... प्रचितीच्या सिद्धू च्या शैक्षणिक कारकिर्दी मागे असलेले स्मृतीचे कष्ट  त्याला आठवणीत राहो.  घरासाठी तिने केलेली घर घर, अत्यंत अवघड अशा नवऱ्याला कसे तयार केले याची आठवण राहो.  .... अन आता मार्च एन्ड चे कारण न देता किमान शेगाव कचोरी  वाढदिवसाच्या निमित्ताने आसपासच्या नातेवाईकांना मिळो!!! 

 घरी सर्वांना बोलवणार आग्रहाणे कितीही नाही नाही म्हणा खाऊ घालणार अगदी नाठाळं दिराला सुद्धा! !! नोकरी सांभाळून उर्वरित वेळेत शिलाई मशीन वर पेडलं मारणारच.  मला वेळ नाही मी कसं करू वगैरे तक्रार नाही.  सगळ्यात महत्वाचे जबाबदाऱ्या अंगावर घेणार. .. राहू द्या वहिनी मी करुन घेते म्हणत.  

   विसरणे हा अतिशय उपयुक्त गुण (अनावश्यक गोष्टी डोक्यात न  ठेवणे या अर्थानं ). ...पण या कुटुंबात विसरणे म्हणजे भयंकर तापदायक!  कदाचित रोजच तिला या हरवणे सापडणे अन विसरणे या गोष्टींशी सामना लग्ना पासून करावा लागतोय तेव्हा. ...

सौ स्मृती ला उदंड आयुष्याच्या स्मृति‘मय शुभ कामना.

Monday, March 17, 2025

रिद्धी दे सिद्धी दे

 रिद्धी दे  सिद्धी दे , वंशात वृद्धी दे 

हृदयात स्थान दे, चितात ध्यान दे 

निकोप ज्ञान दे अभय वरदान दे 

कुटुंबात प्रीत दे जगण्यात रीत दे 

माया दे साया दे निरोगी काया दे 

मान दे सम्मान दे सज्जनते हित दे 

सुख दे समृद्धी दे सर्वांची साथ दे 

शांती दे शक्ती दे  भक्ती भरपूर दे 

धन दे धान्य दे,  आरोग्य संपदा दे 

निरामय जगू दे शतायुषी होऊ दे