पानं

Saturday, July 26, 2025

आला सहस्त्र दर्शना चंद्रा असा गाजवू नकोस

 आक्का 

श्रीमती शांता सरदेशपांडे आमच्या अक्काचं आजीचं “ सहस्त्र चंद्र दर्शन ‘ कार्यक्रमाला खुद्द चंद्रच कार्यक्रमात सहभागी झाला अन त्याचं कुणी कौतुक करत नव्हतं म्हणून तॊ कंटाळून चीड चीड करायला लागला! !! कौतुक फक्त अक्काचंच होणारं ,. मग चंद्राच काय ?  त्याला समजवाण्यासाठी 👇 

अक्काआजीचं कौतुक यासाठी की भावाबहिनींच्या लेकरांना त्यांच्या नातवाना प्रचंड माया लावली.  होतं नव्हतं ते सगळं त्यांच्यावर उधळून टाकलं स्वतःला विसरून ! !!! अन मग उस्फुर्त सोहळा पार पडला खोलापुरात .  संत अच्युत महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या अविस्मरणीय कार्यक्रमाला म्हटलेली रचना. ....


आला सहस्त्र दर्शना 

चंद्रा असा गाजवू नकोस !

गेला एक डाग पुसल्या 

चंद्रा असा माजू नकोस !!


पुण्य जर का हवे तूला तर 

फक्त थांबून पाहू नकोस 

धवल व्हावे वाटे तुला जर 

कोर टाकून जाऊ नकोस 


डाग असता अनेक पुसण्या ,

आहे किती “सहस्त्र ‘गाठायचे 

आक्का खपेल तुझ्याही साठी 

घे दर्शन किती तु घ्यायचे! !!!


आम्ही पुण्यवान समजतो स्वतःला 

समजले का आत्ता तुला 

आम्ही कृतार्थ समजतो स्वतःला 

उमजले का आत्ता तुला 


अरे , हजार दर्शन मिळण्याला 

दिवस एक पुरे आम्हाला 

अरे सहस्त्र दर्शन लाभण्याला 

अंशी वर्ष अपुरे तुला ! !!!


अरे ,शांत शितल चांदण्याला 

पौर्णिमेचीच रात्र तुला 

अरे, नितांत नितळ नंदणाला 

आख्खे आयुष्य अक्का आम्हाला 


अरे कद्रू किती ? म्हणताच ,

राग तुला हा कसा रे येतो  !

अरे,  सूर्याचेचं तेज वाहतो 

तेही पूर्ण रे तु ना वाटतो 


अरे शांत शितल करण्या नावे 

सूर्य तेज गिळतो कसा 

अरे, जाऊन ताकासाठीच गावे 

भांडे तु लपवितो कसा 


काहीच कसे ना शिकला 

तु रे अक्का कडून चंद्रा 

जे जे मिळविले ते जीवणी 

घालून भर त्या वाट चंद्रा 


पहिल्या सहस्त्र दर्शनाला 

कंटाळून कसे चालेल चंद्रा 

आक्का तुझ्या शुभ्रते स्तव 

कष्ट ते किती झेलेल चंद्रा 


अरे भोळी भाबडी आमची आक्का 

घेऊ नको तु फायदा 

अरे पुढच्या “सहस्त्र ‘ दर्शनांसाठी 

देऊन टाक तु वायदा ! !!!!!!


Saturday, July 19, 2025

दादा आमचे गुरु इंदोर

 एकदा ईश्वराकडे मागणं. .

तुझा सहवास दीर्घकाळ हवाय! 

त्यानं गुरु कडे बोट दाखवलं 

गुरूंच्या जवळ रहा 

माझ्यापर्यंतचा मार्ग तिकडेच आहे

माझ्यापर्यंत पोहोचायचंय?

मग गुरु हीच वाट आहे.”

गुरु म्हणजे प्रकाशाचा स्रोत,

अज्ञानाचा नाश करणारा.

गुरु म्हणजेच ब्रह्मस्वरूप –

     ईश्वराच्या साक्षात दर्शनाची पहिली पायरी.

गुरु जवळ रहा, गुरूंची सेवा कर !!

गुरु सेवेचं ठरवलं....

जास्तीत जास्त सहवासाचंही 

भाग्य लागतं !!


अमृतायुषी भाग्य ‘


देवानं ऐकलं दादांना धाडलं! 

दादा

आमचे पाहिले गुरु 

निर्लोभ, निःस्वार्थ,निःस्पृह,निर्मोही

सचोटी सत्यनिष्ठा सदाचरण

सगळं कसं भरभरून दिलंत. .

आमची ओंजळ तुडुंब...

शिस्त, सेवाभाव, नि प्रेमाची गाथा...

तुमचं आयुष्य म्हणजे जगण्याची दिशा।

दादा 

तुमच्या हातात संस्कारांची वीण,

प्रामाणिकतेचीच  वाजविली बीन ।

सामाजिक कार्यांची भक्कम शिडी,

तुम्ही उभारली नितिनिष्ठ गढी ।


आता इतकंच मागणं पुन्हा. ..

दादांच्या आशीर्वादाची तिजोरी 

रीती होऊच नये कधी. .. 


दादा 

संपूच नये सुरूच रहावा

                 तुमचाआमचा प्रवास,

प्रेरणादायी, शांत, दीर्घ

                    नि ध्यासयुक्त श्वास।


“अमृतायुषी शुभकामना ”

(९८व्या वाढदिवसानिमित्त)


अलका प्रमोद अर्चना

Wednesday, July 16, 2025

कुसुम मावशी इंदूर

 त्या सुरकुतल्या 

हाताचा स्पर्श

अन शब्दावाचूनही 

समजणारी ती भाषा  

फक्त त्या हातालाच जमते !


ते हात तो स्पर्श 

.... मायेचं आभाळ,

कधी थरथरतं, 

कधी आधार देतं ,

सत्व, श्रद्धा, श्रमाची गाथा

प्रत्येक रेषेतून उमटवतं .


होय तेच हात 

माझ्यासाठीची शिदोरी 

अंगावर चादर ओढणारी 

थंडीतली उब सुद्धा ! !!


सोन्याची अंगठी 

नव्हती त्याच्यावर बहुदा 

पण सोन्याहून 

भारी आहे ती माया,

जगाच्या गर्दीत हरवलेला मी, 

त्या स्पर्शातच अनुभवलं 

......  खरं सुख अन साया  


त्या सुरकुतल्या 

हातांचा स्पर्श

नुसता आठवला 

तरी डोळे भरावं 

प्रेम, त्याग, 

आणि काळजीचं रूप

त्या एकट्या हातातून दिसावं ! !! 


*ताई*

तुझे सुरकुतले हात 

असेच राहू दे  डोक्यावर 

वर्षानुवर्षे . ..

जगण्यासाठीच्या 

 आशीर्वादाची 

सावली असावी अशी ! !!




इंदूरहून निघताना *कुसुम मावशी* नी चेहऱ्यावरून हात फिरवला डोक्यावर हात ठेवला  अन तो अनमोल मातृ स्पर्श. ... 

खुप काही सांगून गेला न बोलता ☝️. 


मावशीला घरी सगळे “ताई‘  संबोधतात.....