पानं

Friday, December 6, 2024

सुमन आत्या श्रद्धांजली 6डिसेम्बर 2024

“तुझा जप सुरु आहे अन  साक्षात गुरु तुझ्या समोर आहे ‘ अन  आत्याच्या संवादाला  सुरवात व्हायची.  

सुमन आत्याचे  दुसरे नाव लळा! म्हातारी मध्ये काय केमिकल भरले होते कुणास ठाऊक. भारी लळा लावायची सर्वांना.  अधिकार पण गाजावायची आमच्यावर. ..मी सांगते न  मग खा!  


“तुला माझ्याकडचे चालतच नाही अरे चहा तरी! ’

मला घरचे चालत नाही  तुझ्याच नवऱ्याने सवय लावली बाहेरचे खायची!  बाळासाहेब बाहेरून भजे जिलबी खायला आणून देत असत. . अन अगस्ती बिघडला. ... तुला बिल पाठवतो धाब्यावरचे,  पैसे तेवढे पाठव.  तुझ्या नावानं प्रसाद खातो ‘’ 

असे संवाद नेहमीचेच झालेले.  अगस्तीचा नाम जप कर  वॉकर सुटेल मॅरेथॉन पळशील. अगस्ती हा अप्पा शास्त्रीचा अवतार आहे. तुझा बाप प्रभ्याच्या पोटी आलाय वगैरे बोलून झाल्यावर. .. मग  ख्याली खुशाली . माझी नात अन नात जावई का नाही आणले. ती कशी आहे?  मिनूला आणत जा रे सोबत!  

पुन्हा मग “मी आलो तो पुरे नाही का जे येत नाहीत त्यांची तू आठवण काढत राहा. .‘ आत्याशी प्रेमळ संवाद चालत असे. तिला असेच हसत खेळत ठेवावे म्हणजे तिचे डोळे कमी पाणावत . हळवेपण हे  पाचवीला पूजलेले.  मुतरे डोळे ! ! 


हो  अत्यंत कष्ट प्रद आयुष्य जगलेली सुमन. त्या कष्टांची नुसती आठवण यावी तो दरदरून घाम फुटावा.  आणि हे कष्ट काही अपरिहार्य तर काही लादून घेतेलेले. तिचे सोवळे ओवळे हे तिनं लादून घेतलेले. तिला काही गोष्टी जमायच्या नाही म्हणजे नाहीच. .त्या अनुषंगाने आलेले कष्ट मात्र मग  भोगायला आनंदाने तयार!  मला  तर घाम फुटतो. ..

वेगवेगळ्या अपघातांनी तिला पुरते जायबंदी करून टाकलेले. पण आत्याबाई जायबंदी होतील तर ती. सुमा नाही . .वॉकर घेऊन घेऊन स्वयंपाक घरात जाणार. .आल्यागेल्याला न खातापीता जाऊ देणार नाहीच.  आपण बाहेरून काही सोबत पदार्थ न्यावा , तिचे कष्ट कमी  करावे म्हणून तर तिला ते जमत नव्हते. .. 


अगदी गेल्या महिन्यात मी  नशिबाने तिला भेटलो. अमरावतीला मित्राकडे लग्न होतं अन त्याच दिवशी नागपूरला एका लग्नात हजेरी लावायची होती गडबडीत होतो. .नागपूरहून परती च्या प्रवासात आत्याकडे जावे हा विचार होता. यशोदानगर चौकात मला आत्याने जणु साद घातली  हाक दिली. . मी ड्रायवरला गाडी  वळवायला सांगितले अन आत्याशी शेवटचं आमचं  बोलणं , प्रेमळ संवाद झाला अर्धा पाऊणतास!  खुप बोलली तिनं पार तिच्या पणजी पर्यंत नेलं.  खरेतर दहा मिनिटात निघणार होतो पाऊण तास कुठे गेला कळले नाही! 


एक पैका अडक्याच्या पश्चात अधुऱ्या शारीरिक संपन्नतेत (?) लळा कसा लावावा हा  श्रीमंत ठेवा आमच्यासाठी ठेवून देहातून पुढच्या प्रवासाला गेली भावाला खाऊ पिऊ घालायला नक्कीच !  प्रभाला काय आवडते बरं ‘ विचार करत असेल .  


तर अशी ही आमची आत्या.  देवेंद्रा म्हणाला आत्या म्हणजे लळा. मी म्हणतो  सुमन नाही सहन !  लहानपणी गोवर्धन चाळीत अस्मादिकांसाठी सुरु झालेला हा आत्या-लळा प्रवास काल स्तब्ध झाला.  निःशब्द झाला !  


आत्या तुला सदगती प्राप्त होणारच आहे !  आम्ही विनम्र आहोत . 


अगस्ती मिनल

Tuesday, September 24, 2024

प्रबोधन (81 -83 )batch

 ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दिनेशला एन पी टी ई एल परीक्षेत देशात पहिला आल्याबद्दल फेसबुक वर जुनी पोस्ट पाहण्यात आली... आणि त्याला बधाई हेतू फोनवर बोलणे झाले... साल्या सुल्या हरामखोर वगैरे झाले... साला हरामी तर तोच जळगाव हुन नगरला दर आठवड्याला जातो आन एकदाही आठवण काढत नाही... आन वरतून शिव्या पण देते लेकाचा !!! चलो त्याच्या शिव्या सुद्धा हव्या हव्याश्या साऱ्याईले... लई बिगडेल काट्ट! 


       लावलंन बे त्यानं कामाला. निल्याशी आधीच काय ते बोलणं झालेलं. म्हणला venue कुठं ठेवावं. दर्यापूर सगळ्यांच्या आवडीच पण कन्विनियंट नव्हतं. संभाजीनगर पक्क कर म्हटलं तर निल्या दिन्या ओके झाले... 


निल्या तर आधीच तयारीत होता. मग हॉटेल रिसॉर्ट यांचा सर्च सुरू झाला. वेगवेगळे ऑप्शन्स दाखवले. आणि सांगोले काकाच्या मार्गदर्शनात हिरण्यवर शिक्का मोर्तब झाले... पहिले 20 ची संख्या सांगून त्याच्याशी बार्गेनिंग झाले.. आणि मग मोस्ट अवेटेड ग्रुप वर चर्चा! कुणीही सुटू नये यासाठी प्रयत्न या कामी दुसरा दिनेश कार्यरत झाला. 

    निलेश साऱ्याईचे फटू मांगत व्हता कायसाठी थे नंतर कयले... लई झटला. 

     

     सायचं कशात मन लागत नव्हतं. बस गेट टुगेदर.. 21, 22 सप्टेंबर!! अन एकमेकांना आग्रह धरत तब्बल 30 वर संख्या पोहोचली. दिनेश मोहतानी साऱ्याईले मोहात टाकलं. कुणी पैसा अडक्यानं मांग राहू नै म्हणून साऱ्याईची काळजी घेतली... रोज एक एक जोडत गेला. अन 11( अ ) 1981बॅचची 21 सप्टेंबर ची हाजरी 29 भरली yes sir करायले . गज्यानं दांडी मारलीच लेकान्. पण पण अर्धेधिक पोट्टे त्याले घरी बसू देते थ खरं... चुळचुळ मुंगी त्याले बी घरी बसू देते का बा... आला नं दुसऱ्या दिशी! 


निल्या हर्षा रमेश सकाळी चार वाजता पोहोचले. घरच्या सारखे राहिले अत्यानंद झाला. दोस्त मित्रांत कुठला संकोच! 

        "ढोल' दार स्वागत, निल्याची आयडिया, हार घालून मित्रांचे स्वागत झाले. रोहीत इव्हेंट वाला त्यानं ऑनलाईन शोधला, त्याला मी मग संपर्कात ठेवत रिसॉर्ट वर आणला.


          पंजाबी ढोल नी आलेला प्रत्येकाला स्वतः ची पॉझिशन्स /पदं विसरून नाचते केले... त्यांनी वयात चाळीस वर्षाची घट केली सगळे त्याच सतरा अठराच्या वयात कधी पोहोचले कळले सुद्धा नाही! अस्सल ठेवणीतल्या शिव्या, लई दिवसापासून राखून ठेवलेल्या बाहेर पडल्या.... दोस्ताले लागते काय बे सायचा मायचा अन ××ड्या, भो ××च्या!! भल्ले खुश झालते राजे हो!!!! 


      क्रित्येकांना ओळखणे सुद्धा कठीण! दिन्या टिंन्या, बाल्या, काका, भास्कर बास एकमेकांना मिठ्या मारत कवेत घेत होते. चाळीस वर्षांपूर्वीची अनुभूती घेत होते.... 

  टेन्ट मध्ये आल्याबरोबर हेल्थ कॉन्शियस दिनेश सगळ्यांचे वजन घेत होता... Under weight आणि over weight दोघांना त्यानी बक्षीस दिली. खरं तर BMS इंडेक्स वर त्यानी द्यायला हवे होते असं अस्मादिकांचं म्हणणं त्यानं ग्राह्य धरले नाही.. प्रवीण मोहोरील मानाचा गणपती ठरला! बाल्या बारीक !!!(उंदीरच लिहिणार होतो😜 मायला मारच खाल्ला असता, बरं झालं कीं बारीक शब्द आठवला ) .... आमचं प्राईज गेले!!! 

      चहा समोसे झाल्यावर सर्वांनी शाळेचा ड्रेस खाकी चड्डी पांढरा शर्ट परिधान करत प्रार्थना म्हटली सगळ्यांना एका रांगेत उभे केले गेले शाळेची प्रार्थना ते राष्ट्रगीत संपन्न झाले! रामेकरच्या मार्ग दर्शनात . 

    देश हमे देता हैं सबकुछ हम भी तो कुछ देना सिखे.... चा संकल्प सोडण्यात आला. 

रिसॉर्ट वर सगळ्यात चांगली जागा.. छान छोट्या धब धब्या जवळ लागलेल्या टेबलं अन खुर्च्या. खानपान सेवा. निलेश नी सगळी व्यंजनं निवडलेली!! मी हरभरा येथेच्छ हाणला. तसपणं कुणाचं खाण्यात लक्ष होतं कुठं. चाळीस वर्षानंतर किती गप्पा मारू किती नाही या स्थितीत सगळे होते... जेवण कसं का असे ना कुणी कंप्लेंट केली नाही.... 

       आणि मग एका मोठ्या टेन्ट मध्ये पुन्हा एकत्रीकरण. सर्वांनी गेल्या चाळीस वर्षात प्रबोधन सोडल्यावर काय काय केले ते सांगितलं. इन्स्पेक्टर धनंजय पवार यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या अनुभवानी आम्ही त्याच्यावर गर्व केला. सार्थ अभिमान वाटला. शिवसैनिक प्रांजळे का प्रोफेसर महेंद्र, प्राचार्य अशोक का गावाची सेवा करणारा सरपंच विजय रेखे , रामेश्वर ढोके नी गणिताचे भाषेत freind एक्सप्लेन केला.संजय लुलूचे अनुभव, अंत्या स्वभावानुसार अध्यात्मिक, धार्मिकतेला जवळ करणारा सगळ्यांचं कथाकथन झाले.... 

  मध्येच हाय टी च्या नावाखाली कांदभजी अन चहा.. नको नको म्हणता म्हणता जिभेनं सांगितले का बेटा घे हाणून... भजी हाणूनच घेतली आज पथ्यपाणी फाट्यावर!!! 

       सर्वांनी अर्ध्या तासाची डीप नीप घेऊन पुन्हा निलेशच्या संकल्पनेतल्या टी शर्ट अन जीन्स घालून सगळे लॉन वर आले... फोटोशेशन उभे आडवे पाठमोरे अन झुक झुक गाडी करवत निलेश नी मजा आणली!रिसॉर्ट-वर्गाचा मॉनिटरच होता तो!

     त्यानंतर *प्रा विजय पोहनेरकर सरांचा "सुदाम्याचे पोहे '* कविताचा कार्यक्रम. दिनेश अडोकार आधीच केकटलेला "काय पण ते कविता फविता कुणी ऐकते का बे ?' अन ते खरंच होतं. काही लोकं वैतागलेही असणार कदाचित. पण पोहनेरकर सरांनी सव्वा तास कसा लहानपणात गावाकडे पोहोचवला कळले नाही. त्यांची शीळ कविता सगळ्यांना शाळेत घेऊन गेली मी पण माईक भेटला तर चान्स मारून घेतला कारण...... *पितांना मी कधी रिस्क घेत नाही!!* पिण्या आधी चान्स घेऊन टाका... 

      निलेश नी पीपीटी प्रोजेक्टर वर प्रेसेंट केला. सोबत आठवणी साठी *"आम्ही प्रबोधनी सार्थ अभिमानी '* मोमेन्टो एकमेकांना दिला. संजूभाऊ प्रांजळे त्याला कॉलेज कडून मिळालेलं गौरव पत्र वाचता झाला तर मोहता नी शाळेच्या सरांच्या, *स्व अण्णाजी वैद्य, ग रं जोशी* सरांच्या आठवणी सांगून गहिवरून आणले. अन मग अनेकांच्या आठवणीना उजाळा मिळाला. 

     रात्रीचे डिनर उरकून काही मंडळी आपापल्या टेन्ट मध्ये गप्पामध्ये रंगली तर तिकडे दिन्या निल्या कराओके वर झिंगाट 'डान्स'ली ... ईज्या होता का व्यवस्था पायला... मोट्टा सायेब हाय नं तो दिल्लीहून आल्ता ! म्या ब्लु टूथशी खूप झटापट केली मात्र ते कनेक्ट झाले नाही... तिकडं सगळे प्रोफेशनल होते. त्यात मी अनपढ काय रड पाडणार व्हतो... 

        टेन्ट मध्ये मला दिनेश मोहता, मिलिंद शहा यांच्याशी गप्पा मारता मारता झोप लागली. सकाळी पुन्हा चार वाजता जाग आली तो गप्पा सुरु. काही मंडळी रात्री बारा एक ला झोपलेली सकाळी चार वाजता पुन्हा फ्रेश गप्पष्टाकांमध्ये मशगुल झालेली!! 

    सकाळी संज्या प्रांजळे स्विमिंग मध्ये तर काही ट्रेकिंग ला गेली तलावकडे. काही मंडळी सुनील झोम्बाडे, साबळे, अमोल बोरकर घृषनेश्वर दर्शनाला गेली. 

        ब्रेकफास्ट तब्येतीनं झोडून लांबची मंडळी निघाली प्रवासाला.. अन गजाननराव भारसाखळे यांचे पदार्पण झाले. गज्या भाऊ नुकताच पर्यावरण गोरक्षण कार्यासाठी गौरवीला गेलेला. त्याचा सत्कार अपेक्षित होता मात्र त्याला वेळ नव्हता. सामाजिक क्षेत्रात कार्यरत गज्यापासून गजाननराव पर्यंतचा त्याचा प्रवास उल्लेखनीय आहे. स्वछता अभियान, वृक्षारोपण गोरक्षण क्षेत्रात त्यानं खूप मोठं काम केलेले! कुडोज टू गज्याभाऊ. 

      दरवर्षी एक दिवस 11(अ) चा वर्ग नियमित झाडून येणारा गज्याभाऊ भावला. ज्या शाळेत शिकला त्याच शाळेनं त्याला प्रमुख अतिथी चा सन्मान दिला.  

एचएम भास्कर जावरकर, चंदू करने , छोट्या ( सगळे याला छोटू पाटील म्हणत.. लई फ़ुगे मी मात्र छोट्याच म्हणायचो ! मी अंत्या छोट्या असं त्रिकुट होतं आमचं... तर मनोज वानखडे का बर शांत शांत होता? ) अरुण टोळे यांनी रंगत आणली गेट टुगेदर मध्ये.


          गाठी भेटी, ऊर भेटी संपत नव्हत्या. प्रत्येकाच्या मनात एकच मनीषा होती... 

     *मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय* 

           *दोघांच्या बाकावर तिघांनी बसायचंय!!!*


 *दिन्याला शैल्याच्या हळूच खोड्या काढायच्याय* 

     *टिन्या दिन्याची भांडाभांडी पाहायला...*

          *मला पुन्हा एकदा शाळेला जायचंय!!!* 



सगळ्यांना दीर्घ निरामय आरोग्याच्या शुभेच्छांसह..

आपला 


मंगलमूर्ती प्रभाकरराव शास्त्री 


ता. क : 

डी जी सरांच्या कृपेनें सर्वाना पूर्ण नावं पाठ होते... हे आश्चर्यच!

Thursday, September 19, 2024

पितृत्रयी मातृत्रयी पितामह मातामह मंगलमूर्ती शास्त्री वंशावळ

 पितृत्रयी : प्रभाकर - रेणुकादास - रंगनाथ

               सुलभा - सरस्वती     - लक्ष्मी
मातृत्रयी: सुलभा - प्रभावती -  रेणुका
मातामह: दत्तात्रय यशवंत रामचंद्र (हरित)
पितृत्व : गोपाल कृष्ण -श्रीकांत , विरेंद्र
            उषा -मालती- सुधा - धनश्री- शलाका
पितृ भगिनी : जानकी (वशिष्ठ) शकुंतला (जमदग्नी) कालिंदी (काश्यप  )
कुमुद (जमदग्नी )
श्वसुर: कृष्णराव - विठ्ठलराव (वशिष्ठ)
गुरु : प्रभाकर रेणुकादास ( भारद्वाज)
कुलगुरू : त्र्यंबक


धन धान्य पशु वृध्दी पुत्र पौत्र समस्त 

Monday, May 6, 2024

पर्रीकर श्रध्दांजली

 "ते समोर चाललेले पर्रिकर साहेब आहेत बहुतेक ' ललित म्हणाला ...

"अरे ते देशाचे मंत्री आहेत , त्यांच्या मागेपुढेच पाच दहा गाड्या असतात ' इति आम्ही .

शास्त्रीजी खरंच ते भाई आहेत भाई , केंद्रीय मंत्री ! ' सोबतच्यानी ललीतची भलावण केली . आम्ही झट झट पावले उचलली , समोरच्या दोघांना क्रॉस केले पाहतो तो खरेच परिकर साहेब होते . पणजीच्या भाजप कार्यालयाच्या पायऱ्या एव्हाना भाईंनी चढलेल्या होत्या . .. साधा हाफ बाह्याचा यु कट शर्ट , पॅन्ट ,चष्मा गळ्यात लटकलेला . .. 

          एक मंत्री इतका साधा असू शकतो अविश्वसनीय मात्र सत्य होते  . 

       प्रधानमंत्री मोदींजींच्या सभेच्या वेळी आम्ही प्रेक्षकांमध्ये उभे होतो तोच थोड्या वेळात गलका ऐकू आला पाहतो तो थेट पर्रिकरजी जनतेत उभे . सगळ्यांच्या हातात हात घेत , सुरक्षा रक्षकांना दूर ठेवत , एकदम अलगद जनसामान्यांच्यात मिसळलेले भाई ! मी त्यांचे जवळ गेलो एक सेल्फी काढण्यासाठी  . तेही थांबले क्षणभर , सेल्फी मला काढता आला नाही ... गेला चान्स ! 

       सभा संपवून पणजी भाजप कार्यालयाकडे निघालो .रस्त्यात भाई कुणा कार्यकर्त्याबरोबर बोलत उभे होते , मला आवाज देऊन " आता मोकळेपणाने सेल्फी ट्राय करा म्हणाले ,मी पुन्हा प्रयत्न केला .सेल्फी घेणे जमले नाही, जसा फोटो आला तसाच सही मानून ,  परत मात्र त्यांचा जास्त  वेळ घेणे मला संयुक्तिक वाटले नाही .त्यांचे आभार मानून तेथून काढता पाय घेतला .... मनावर " आमच्या नेत्यांना भेटणे इतके सोप्पे आहे तर ' हि भावना कोरली गेली .अधिक जोमाने माझ्यातला  कार्यकर्ता कामाला लागला . 

      फोंडयाच्या डॉ साठ्यांना भाई सकाळी पाच वाजता सफाई कर्मचाऱ्यांना निर्देश देतांना , स्कुटर वर फिरतांना दिसतात  आणि राजकारणापासून दुरी राखणाऱ्या साठ्यांना नंतर या विषयात कसा इंटरेस्ट तयार झाला हे ऐकले की आमच्या इकडच्या नगरसेवकांचा तिथे गोव्यात वर्क शॉप ठेवला पाहिजे असे वाटते  .  एक मुख्यमंत्री इतका ... 

             वाळपोई मतदार संघात प्रभारी म्हणून जबाबदारी निभावताना भाईंचे सादगीचे अनेक किस्से ऐकायला मिळायचे .स्वतः आम्हा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले वरचे किस्से आज त्यांच्या जाण्याने पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभे राहतात,  डोळ्यांच्या कडा ओल्या करतात . 

          भाई तुम्ही गेलात , राजकारण्यांसाठी संस्कार मागे ठेवत निघून गेलात , राष्ट्र तुमचे हे ऋण कदापि विसरणार नाही . 

       श्री गुरुजींनी दाखवलेला पथ आपण जीवनभर एक स्वयंसेवक या नात्याने  सांभाळला त्यामुळेच मग ...

         शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य उज्वल

         निन्दकोंपर मात करता आपका व्यवहार निर्मल 

 ...... असे जीवन  आपण जगलात ! नुसते गोवाच नाही तर संपूर्ण देश "पोरकं होणं ' अनुभवतय .

               शत शत नमन  - मंगलमुर्ती शास्त्री औरंगाबाद .



          

          

Wednesday, April 17, 2024

यंदाची रामनवमी कल्पक अन् म्हल्ल्याच्या नावे..

 17 एप्रिल 2024

          या वेळेची राम नवमी सर्वार्थानं वेगळीच ठरली . अयोध्येत राम लला विराजमान होण्याची पार्श्वभूमी जशी लाभली तशीच आपल्या गृपवर मल्हारने आपल्याला सुखद असे कॉन्वकेशन फोटो अन् व्हिडिओ पाठवून आम्हाला आनंद दिला अन् अर्थातच डॉ मल्हार मानसी मनीष देशपांडे डॉक्टरांमधला नटसम्राट किताब सोबत  घेऊन आल्यानं आमची रामनवमी सुखावली . अभ्यास एके अभ्यास एव्हढाच ध्यास घेतला तरच एमबीबीएस होता येत इतकचं आम्हाला ठाऊक !! अभ्यासासोबत एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज अन् त्याची पावती  ,त्याही कॉलेजचा एक वर्षाच्या इंटरनशिप गॅप नंतर सर्व सहशिक्षार्थी प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करतात हेच मुळी आनंददायी . मानसी मनीष ची तब्येत खुश ! आता वाट पार्टीची !! 


अन् दुसरा आनंद हि रामनवमी देती झाली ह  भ प कल्पक पिंगळे महाराजांच्या रूपानं! 

      प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्यात स्वतःच्या  कंपनीचे संचालन करणे , आयटी त काम करणाऱ्या व्यक्ती  कडून , बक्कळ पैसा खिशात बाळगून हि मंडळी असतात म्हणून ... आणि अशी पार्श्वभूमी मला असती तर माझ्यातला सामान्य सीसीडी, मॅक डोनाल्ड , ते दिल्ली दरबार ते रात्र समयी कामाचा ताण खूप आहे यार म्हणत एखादा

 " बार ' जवळ करता झाला असता !! थॅन्क्स गॉड त्यानं माझ्या कडे असा बक्कळ दिला नाही !!!.... तर कल्पक नी वाट वळणाची निवडली . इतर बार टाळत  त्यानं  राम दरबार  जवळ केला  अन् एका ह भ प चा जन्म झाला ! अन् आम्हीही बॅनर वर कल्पक पिंगळे महाराज

 ( BE ) अशी त्याची डिग्री टाकत प्रसिध्दी करते झालो . इंजिनिअर अन् ह भ प या कुतूहलापोटी आम्ही श्रोते मिळवले हॉल गच्च झाला बाहेर सुद्धा बऱ्यापैकी खुर्च्या लोकांनी जवळ केल्या ... 


....अन् महाराजांनी नारदीय कीर्तन परंपरेचे विवेचन देऊन प्रारंभ केला . कीर्तन परंपरा नारदांनी सुरू केल्याचे अन् नवविधा भक्तितील एक मार्ग " किर्तन ' विस्तृत सांगत श्रोत्यांना हुशार केलं . ... 

    

    नारदीय कीर्तन पद्धतीमध्ये सुरुवातीला मंगलाचरण म्हणजे इष्ट देवतेच (गणपती,राम,वैगेरे.) स्मरण. त्यानंतर नमन म्हणजेच सद्गुरूला वंदन. पुढे भजन, जयजयकार (हरिनामाचा) आणि पूर्व रंगास सुरुवात. हा पूर्व रंग जवळपास तासाभराचा असतो. यामध्ये पदयात व गद्यात अभंग किंवा श्लोक म्हटला जातो व त्या श्लोकाचे विवरण (स्पष्टीकरण) केले जाते. नतर छोटासा मध्यांतर होऊन उत्तर रंगास आरंभ होतो. या उत्तर रंगामध्ये पूर्व रंगातील अभंग किंवा श्लोकातील मर्म अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी आख्यान सांगितले जाते. आख्यानातील कथेला मजेदार करण्यासाठी कथेनुरूप पद, दिंड्या, आर्या, ओव्या,  लावणी, आजकाल सिनेमाची गाणी पेरली जातात. अन् खुसखुशीत स्वाद दिला जातो . ... वगैरे सांगितल्या वर समर्थांची ओवी पूर्वार्धात महाराजानी घेतली 

     

मना मत्सरे नाम सांडू नको हो ।

अती आदरे हा निजध्यास राहो ॥

समस्तांमधे नाम हे सार आहे ।

दुजी तूळणा तूळिताही न साहे ... 81 वी ओवी समर्थांची . 

    आज रामनवमीला रामकथा महाराज सांगणार होते  अन् हे काय यांनी सुरू केले . अस्मादिक किंचित घाबरले सुध्दा !! अनपढ गवार अगस्ती . .. लोकांना जमवायचे महाराजांचे नाही नाही ते कौतुक करायचे अन् रामकथा ऐकायला आलेल्या मंडळींना ... मत्सर वगैरे समर्थांची ओवी नी सुरवात. .. महाराजांनी "कल्पक ' तेनं पूर्वार्ध सजवला . अन् राम जन्म कथे शी सांगड घालत मनातल्या मत्सर ला कशी अन् का तिलांजली द्यायची सुरेख शिक्षित केलं . रामजन्म होऊन सुश्राव्य कीर्तनाची सांगता झाली . ... कल्पक नी बोलत रहावं बास्स!!

       कल्पक  आफळे बुवांच्या  तालमीतला पठ्ठ्या मग खुसखुशीत मेजवानी तर मिळणारच. ती त्यानी दिली . स्टेजवर मग आपसूकच त्याला प्रणाम घालायला लागला नसता तर नवल . रात्री उशिरापर्यंत लोकं कार्यक्रम देखणा झाल्याचं सांगत होते माझं उर भरून येत होतं. किंचित वजनही वाढलं असेल हभप कल्पक महाराजांच्या मेहनतीनं .

        तर अशी एकंदरीत यावेळची रामनवमी सुफळ संपूर्ण होती झाली.      लोकाभिरामं रंरगधीरं  राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ... 

अश्या रामाने खरंच खूप काही दिले एकीकडे हभप तर तिकडे नटसम्राट . रामकृष्ण हरी पांडुरंग हरी  ... 


कल्पक अन् म्हल्ल्या दोघानाही धन्यवाद ... रामनवमी सजवल्या बद्दल !! 

मनापासून अभिनंदन 

वंद्य वंदे मातरम् . भारत माता की जय . 



(सदर कीर्तन एफबी वर सध्या आहे लवकरच युट्यूब वर अवतरेल .)

- अगस्ती

Saturday, March 9, 2024

जिवेत शरद: शतम

 जिवेत शरद: शत


या जन्माची गत जन्माची पुण्याई सुफलो
दिर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हा लाहो
विघ्नविनाशक गणेश तुम्हा वर देवो सुखदम
जिवेत शरद: शतम_" । जिवेत शरद: शतम_

पुत्र पौत्र धन धान्य संपदा वर्षतु तुमच्या गेही
विजयश्रीची अवती भवती सदा फिरो ग्वाही
lउणीव कसली तुम्हा न भासो आस हीच नित्यम
जिlवेत शरद: शतम। जिवेत शरद: शतम

उभय लोकीचे सौख्य साधन्या स्मरा पंच साधना
जिवा शिवाचे ऐक्य साधने नको दुजी कल्पना
नर जन्माचे सार्थक व्हावे आस हिच नित्यम
जिवेत शरद: शतम_। जिवेत शरद: शतम_